जीवघेणा प्रवास! म्हासुर्ली-चौधरवाडीची वाट धोकादायक!!

राज्यमार्गाचा दर्जा होऊ पाहणाऱ्या गगनबावडा व राधानगरी तालुक्यांना जोडणारा म्हासुर्ली-चौधरवाडी दरम्यानच्या पुलाजवळील रस्त्याची पावसाने प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील प्रवास वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असून, ‘खड्डय़ांतील रस्ता’ अशी या रस्त्याची ओळख होत आहे. वर्षानुवर्षे ये-जा करणाऱ्या नागरिकांना ही वाट अतिशय त्रासदायक होत असल्याने नरकयातना सोसाव्या लागत आहेत. या रस्त्याला कोणी वालीच राहिला नाही, अशी अवस्था आहे.

म्हासुर्ली-चौधरवाडी हा रस्ता म्हणजे बेळगाव-निपाणी-राशिवडे-अणदूर – गगनबावडा हा असा प्रस्तावित राज्यमार्ग आहे. धामणी खोऱ्यात धुंदवडे व म्हासुर्ली या प्रमुख बाजारपेठा असल्यामुळे नेहमीच लोकांची ये-जा असते. सध्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे धामणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यात नदीवरील म्हासुर्ली बंधाऱ्याला संरक्षण कठडा नाही. वादळवाऱ्याने प्रवासी नदीत पडण्याची भीती आहे. गगनबावडा तालुक्याच्या हद्दीतील सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम झाले आहे. पण, म्हासुर्लीकडील बाजूच्या रस्त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. रस्त्यावरून दुचाकी चालवणे म्हणजे दिव्यच बनले आहे, तर चारचाकी वाहने जाणे बंद झाले आहे. प्रस्थापित असलेल्या या पुलाचे काम करण्यापूर्वी प्रशासनाने याकडे लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

गेली 18 वर्षे या मार्गावरून शाळेला नोकरीनिमित्त जात आहे. अनेकवेळा या रस्त्याबाबत वृत्तपत्रात बातम्या येतात. मात्र, कोणीही लक्ष देत नाही. म्हासुर्ली-चौधरवाडी रस्त्याचा प्रवास अतिधोकादायक बनला आहे. अनेकवेळा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन रस्त्याबरोबरच पुलाला संरक्षण कठडय़ाचा आधार देणे गरजेचे आहे.- डी. आर. नलवडे, शिक्षक, धामोड