दत्ता दळवी यांच्या जामिनावर आज फैसला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर मुलुंडचे दंडाधिकारी न्यायालय शुक्रवारी सकाळी निर्णय देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली म्हणून दळवी यांना बुधवारी अटक करण्यात आली. या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत दत्ता दळवी यांनी जामीन अर्ज दाखल केला. त्यावर गुरुवारी सायंकाळी सुनावणी पूर्ण झाली.

दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर महानगर दंडाधिकारी एम. आर. वाशीमकर यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी दळवी यांच्यातर्फे अॅड. संदीप सिंह यांनी मिंधेंच्या दबावातून करण्यात आलेल्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला. ज्या कलमामध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, अशा कलमांतर्गत अटकेची कारवाई करण्याआधी 41(अ) ची नोटीस देणे बंधनकारक आहे, मात्र दळवी यांना ही नोटीस न देताच अटक करण्यात केली. वास्तविक राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून मते मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्यात आली आहे, असा युक्तिवाद अॅड. सिंह यांनी केला. त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेत दंडाधिकारी वाशीमकर यांनी दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी 11 वाजता निर्णय देणार असल्याचे जाहीर केले.

राजकीय सूडभावनेने बेकायदेशीर कारवाई
दत्ता दळवी यांना राजकीय सूडभावनेने बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. राज्यघटनेने प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला मतस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र या अधिकारावर गदा आणून मते मांडण्याचे स्वातंत्र्य चिरडले गेले आहे, असाही दावा दळवी यांच्यातर्फे अॅड. संदीप सिंह यांनी सुनावणीवेळी केला. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांकडे लक्ष वेधले.

भांडुप पोलीस ठाण्याबाहेर निषेध करणाऱया शिवसैनिकांवर गुन्हे
कोणतेही सबळ कारण न देता केवळ मिंधे सरकारच्या इशाऱयावरून शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली. सूडबुद्धीने करण्यात आलेल्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी भांडुप पोलीस ठाण्याच्या परिसरात शेकडो शिवसैनिक जमले होते. ही बाब मिंधेंना झोंबली असून पोलिसांनी आज 30 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विरोधकांनी मिंधे सरकारवर केलेली टीका, निषेध आणि केलेली आंदोलनेही आता सत्ताधाऱयांना सहन होईनाशी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली म्हणून बुधवारी सकाळी उपनेते दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केली. दळवी यांना नेमक्या कोणत्या कारणांसाठी अटक करण्यात आली, याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक भांडुप पोलीस ठाण्याबाहेर जमले. संतप्त शिवसैनिकांनी दळवी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून अटकेचा निषेध केला. मात्र, निषेध करणाऱया दीपमाला बढे, राजराजेश्वरी रेडकर, सुरेश शिंदे, दिलीप भामे, संगीता गोसावी, किरण सुर्वे, उमेश माने, राजेश सावंत, सुभाष वाकोडे यांच्यासह 30 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. भांडुप पोलिसांनी शिवसैनिकांवर 151 चे कलम 37 (3), 135 प्रमाणे हे गुन्हे दाखल केले आहेत.