मराठी बोलण्याचा अभिमान बाळगा, पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांचे आवाहन

आजकालची मुलं घरातसुद्धा इंग्रजीत बोलतात याचे मला दुःख आहे. मराठी ही फार समृद्ध भाषा असल्यामुळे मराठी बोलण्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे, असे मत पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघ आणि श्रीमती पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. त्याप्रसंगी उपायुक्त सातपुते बोलत होत्या.

एकदिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक व कवी प्रा. अशोक बागवे होते. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली त्यात दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उद्घाटनाच्या कार्यक्रमात कॉलेज उपप्राचार्या डॉ. माधुरी वैद्य यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी साहित्य संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. लेखक सुरेश वांदिले यांना बालसाहित्य पुरस्कार तर विजय साळवी यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेवटी डॉ. गीता जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. चित्रकार विजयराज बोधनकर यांची ‘चित्राची भाषा’ या विषयावर  विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली.

‘आजच्या तरुण पिढीसमोरील आव्हाने’ या परिसंवादात विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनता, बेरोजगारी, शिक्षणातील ताण तणाव आणि सोशल मीडिया यावर निबंध सादर केले. सामाजिक कार्यकर्ते अमेय महाजन यांनी मार्गदर्शन केले. कवी श्रीकांत पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात बारा महाविद्यालयीन कवींनी भाग घेतला.  कार्यवाह बेंडखळे यांनी संमेलन यशस्वी केल्याबद्दल प्राचार्या डॉ. आशा मेनन यांचे अभिनंदन केले.