खोया खोया चांद – भूमिका

>> धनंजय कुलकर्णी 

आज विस्मृतीत गेलेली, पण एकेकाळी मराठी चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयातून रसिकांना लुभावणाऱ्या हंसा वाडकर या अभिनेत्रीचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. 24 जानेवारी 1924 साली मुंबईत जन्मलेल्या हंसाचे खरे नाव रतन भालचंद्र साळगावकर. वडील एका कलावंतीणीच्या घरातले तर आई देवदासी घरातील. समाजातील एक दुर्लक्षित आणि बहिष्कृत वर्गामध्ये जन्म घेतल्यामुळे संघर्ष हा तर पाचवीला पूजलेला होता. हंसाबाईंचे जीवन अतिशय संघर्षमय होते. स्त्री म्हणून पुरुषप्रधान समाजात वावरताना त्यांनी अथक संघर्ष केला. चित्रपटात विविध भूमिका साकारणाऱ्या हंसाबाईंना आपल्या स्वतःच्या आयुष्यातील नेमकी कोणती भूमिका घ्यावी हे कळलेच नाही. मनाच्या या संभ्रमावस्थेने त्यांच्या आयुष्याची पुरती फरपटच झाली. आज इतक्या वर्षांनंतर आपण जेव्हा तो संघर्ष पाहतो तेव्हा हंसाबाईंचे खरंतर कौतुक वाटते. कारण सगळय़ा बाजूला नकारात्मक वातावरण आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हा लढा दिला होता. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात ख्यातनाम पत्रकार अरुण साधू यांनी हंसाबाईंना भेटून त्यांचे आत्मकथन शब्दांकित केले. त्यांच्याच एका लोकप्रिय चित्रपटाच्या नावाने म्हणजेच ‘सांगते ऐका’ या नावाने ते प्रसिद्ध झाले. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी 1977 साली याच पुस्तकाचा आधार घेत ‘भूमिका’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. ‘भूमिका’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपट आणि आत्मकथन या दोन्ही माध्यमांचा स्वतंत्र विचार करावा लागेल. कारण आत्मकथन हे जास्त प्रभावी आणि आजच्या भाषेत सांगायचे तर बोल्ड आहे. चाळीस-पन्नासच्या दशकातील एका मराठी अभिनेत्रीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्याम बेनेगल यांनी केला. हंसाबाईचा जन्म 24 जानेवारी 1924 चा. त्यांची आजी देवदासी होती. आईदेखील देवदासी, पण बंडखोर होती. तिने चक्क लग्न केले होते, परंतु हंसाचे बालपण अतिशय कष्टात गेले. सतत दारू पिऊन घरात पडलेले कर्तृत्वशून्य हताश वडील, घरात सतत होणारी भांडणे त्यातून हंसा कायम दुर्लक्षितच राहिली. काही वर्षे सावंतवाडीमध्ये काढल्यानंतर पुन्हा मुंबईमध्ये आली. तिच्या आईच्या प्रियकरानेच पुढे तिच्याशी लग्न केले! आयुष्याचा खेळखंडोबा इथूनच सुरू झाला. वयाच्या 12 व्या वर्षी 1936 साली ललित कलादर्श मुव्ही टोनच्या ‘विजयाचे लग्न’ या चित्रपटापासून तिने रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. सिनेमामुळे आपल्या घराण्याची बदनामी होऊ नये म्हणून तिने चक्क नाव बदलले आणि ती बनली हंसा वाडकर. गाण्याची आणि नाचण्याची कला, देखणा चेहरा यामुळे रुपेरी प्रवेश लवकर झाला. बॉम्बे टॉकीज, प्रभात फिल्म कंपनी, नॅशनल फिल्म कंपनी यांच्यासोबत ती चित्रपटातून काम करू लागली, परंतु तिचा नवरा तिचे सर्वअर्थाने शोषण करत होता. हंसाला आता स्वतःची वाट शोधायची होती. या बंडखोरीतूनच ती घरातून बाहेर पडली आणि तिच्या समवेत काम करणाऱ्या अभिनेता राजन जावळे याच्यासोबत राहू लागली.

पण हा अभिनेता देखील तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. हंसाची घुसमट दिवसेंदिवस वाढत होती. यातूनच ती एका जमीनदारसोबत रिलेशनशिपमध्ये मराठवाडय़ात राहू लागली. इथेदेखील तिच्या स्त्रित्वाला बंधन होते. या दुष्टपातून सुटण्यासाठी पुन्हा ती आपल्या नवऱ्याकडे परत आली, परंतु हालअपेष्टा काही संपल्या नाहीत. हंसाचा या प्रवासात एकच प्याला तिची सोबत करू लागला. त्याने तिची तब्येत आणखी ढासळू लागली आणि वयाच्या 47 व्या वर्षी 23 ऑगस्ट 1971 रोजी तिचा अंत झाला. ‘मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते’ असेच हंसा जाताना म्हणाली असावी.

याच कथानकावरील ‘भूमिका’ या चित्रपटात हंसा वाडकरच्या भूमिकेतील स्मिता पाटीलने जबरदस्त अभिनयाचा प्रत्यय दिला आहे. खरंतर स्मिता पाटीलला नाचण्याचे अंग नव्हते, पण या चित्रपटातील नृत्य आणि गाणी तिने चांगली साकारली होती. स्मिताचा चेहराच खूप बोलका होता. त्यामुळे हंसाची वेदना, जगण्याची असोशी आणि स्वत्वाचा शोध घेतानाचा प्रवास फार चांगल्या रीतीने तिने दाखवला. तिच्या नवऱयाच्या भूमिकेमध्ये ‘अमोल पालेकर’ आहेत. रुपेरी पडद्यावरील तिचा नायक राजन जावळेची भूमिका अनंत नाग यांनी केली आहे, तर जमीनदाराची भूमिका अमरीश पुरी यांनी निभावली आहे. तिच्या आईच्या भूमिकेमध्ये सुलभा देशपांडे तर आजीच्या भूमिकेमध्ये जुन्या अभिनेत्री कुसुम देशपांडे आहेत. तिच्या वडिलांची भूमिका ख्यातनाम कन्नड अभिनेते बी. व्ही. कारंथ यांनी केली आहे. चित्रपटातील गाणी वसंत देव आणि मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली होती तर संगीत वनराज भाटिया यांनी दिले. तुम्हारे बिन जी न लगे घर में (प्रीती सागर), बाजू रे मोंदर बाजू रे (सरस्वती राणे, मीना फातर्पेकर), घट घट में राम रमय्या (प. फिरोझ दस्तूर), मेरा झिस्कीला बलम न आया (प्रीती सागर), मेरी जिंदगी की कश्ती तेरे (चंद्रू आत्मा), सावन के दिन आये बालमवा आन मिलो (भूपिंदर सिंग, प्रीती सागर) ही गाणी सुरेख बनली होती. चित्रपटात नसिरुद्दीन शाह, कुलभूषण खरबंदा, बेंजामिन गिलानी यांच्यादेखील छोटय़ा छोटय़ा भूमिका आहेत.

हा चित्रपट स्मिता पाटीलने केला त्यावेळी तिचे वय अवघे 22 वर्ष होते. ‘भूमिका’ चित्रपटातील हाय व्होल्टेज ड्रामा स्मिता पाटीलने अतिशय अप्रतिमरीत्या वठवला होता. तिला या भूमिकेसाठी राष्ट्रीय तसेच फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाची पटकथा श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड आणि सत्यदेव दुबे यांनी लिहिली होती. त्यांनादेखील राष्ट्रीय तसेच फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाचे संवाद सत्यदेव दुबे यांचे होते. सत्तरचे दशक जसे अॅक्शन मूव्हीचे होते तसेच पॅरलल मूव्हीज (आर्ट सिनेमा) सुद्धा होते. हंसाबाईंच्या जीवनात संघर्ष कायम होता. आज हंसा वाडकरची आठवण कोणालाच नाही. आजच्या पिढीला तर हे नावदेखील नवीन आहे, पण किमान तिच्या जन्मशताब्दी वर्षात तरी आठवण्यासाठी ‘भूमिका’ हा सिनेमा पाहणे गरजेचे आहे. हा सिनेमा यूटय़ूबवर नि:शुल्क उपलब्ध आहे. अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत रामशास्त्री (दि. गजानन जागीरदार), लोकशाहीर राम जोशी (दि. व्ही शांताराम), पुढचं पाऊल (दि. राजा परांजपे), पाटलाचे पोर (दि. दिनकर द पाटील), सांगते ऐका (दि. अनंत माने), मी तुळस तुझ्या अंगणी (दि. राजा ठाकूर) या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

अभिनेत्री हंसा वाडकर हिचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने तिला भावपूर्ण आदरांजली!

[email protected]

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)