अनुराधा

>> धनंजय कुलकर्णी

दुस्थानी समाजात पत्नीने पतीच्या सुखातच आपले सुख शोधायचे असते का? पतीच्या स्वप्नांना बळ देताना स्वतःच्या आशाआकांक्षा यांच्याकडे कायम दुर्लक्ष करायचे असते का? स्वतःचे अस्तित्व विसरून जाऊन पतीच्या वलयात विरघळून जायचं असतं का? आणि मुख्य म्हणजे पत्नीच्या स्वप्नांचे काय याबाबत कधी कोणी विचार करायचा की नाही? या आणि अशा असंख्य प्रश्नांना घेऊन ऋषिकेश मुखर्जी यांनी 1960 साली ‘अनुराधा’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. खरं म्हटलं तर त्या काळाच्या मानाने हा विषय काळाच्या खूप पुढचा होता. स्त्रियांचे स्वतंत्र करीअर याचा कुणी विचारही तेव्हा करत नव्हते. ‘अनुराधा’ या सिनेमाला त्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले होते. ऋषिकेश मुखर्जी यांची चित्रपटाची मांडणी अतिशय तरल आणि भावस्पर्शी होती. आज जवळपास साठ- बासष्ट वर्षांनंतरही चित्रपटातील प्रत्येक पात्र आपल्याला भारावून टाकते. आजच्या व्यस्त जीवनात हे प्रश्न कोरिलेट होत असले तरी त्या काळाशी ते सुसंगत नव्हते. चित्रपट कृष्णधवल जरी असला तरी ऋषिकेश मुखर्जी यांनी दिलेल्या ‘मिडास टच’ने हा चित्रपट मनात सप्तरंगी भावनांची उधळण करतो. या चित्रपटाला संगीत ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांचे होते. त्यांनी आपल्या फिल्मी करीअरमध्ये अगदी बोटांवर मोजण्याइतके चित्रपट संगीतबद्ध केले.

चित्रपटाचा नायक डॉक्टर निर्मल चौधरी हा (बलराज सहानी) हा एक आदर्शवादी विचारांचा ध्येयवेडा डॉक्टर आहे. त्याच्या आईचा मृत्यू केवळ डॉक्टरी इलाज न मिळाल्यामुळे झाला होता. ही ठसठसणारी वेदना त्याच्या मनात सलत असते. त्याने त्याच वेळी निर्णय घेतलेला असतो की, डॉक्टर होऊन आयुष्यभर आपण रुग्णांची सेवा करायची. जी वेळ आपल्या आईवर आली ती पुन्हा दुसऱ्यावर येऊ द्यायची नाही. गरीब रुग्णांची सेवा करणे हे त्याचे पॅशन असते. स्वतःच्या सुखाकडे, भौतिक गरजांकडे त्याचे लक्ष नसते. त्याची पत्नी अनुराधा (लीला नायडू) ही एकेकाळची प्रसिद्ध गायिका असते. तिच्या अनेक रेकॉर्डस् लग्नापूर्वी आलेल्या असतात. रेडिओवर ती गात असते. लग्नापूर्वी संगीत हेच तिचे जीवन असते. तिचा आवाज आणि गाणं ऐकून निर्मल अनुराधाच्या प्रेमात पडलेला असतो. चित्रपट सुरू होतो तेव्हा त्यांच्या लग्नाला दहा वर्षे उलटून गेलेली असतात. रेणू नावाची त्यांना एक मुलगी असते. डॉक्टर असूनदेखील निर्मलला भौतिक सुखाचा, पैशांचा अजिबात मोह नसल्यामुळे अतिशय काटकसरीने आणि गरिबीत त्यांचा संसार चालू आहे. अनुराधा तर आता गाणे पूर्णपणे विसरून गेली आहे. एकेकाळी आपण गात होतो हेच तिला आठवत नाही. माहेरी अनुराधा गर्भश्रीमंत घरात वाढलेली असते, पण आता पतीच्या संसारात तुटपुंज्या पैशांत संसार ओढत आहे. तिच्या जीवनातील संगीत हरवल्याने ती काहीशी सैरभैर झाली आहे. आपली निवड चुकली तर नाही ना, अशी तिला शंका आता वारंवार येऊ लागते.

खरं तर त्यांचा प्रेमविवाह झालेला असतो. त्या वेळेला तिचे गाणे ऐकूनच निर्मल तिच्यावर मोहित झाला होता. अनुराधाकरिता तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा दीपकचे (अभी भट्टाचार्य) स्थळ सांगून आलेले असते. दीपक विलायतेत शिकून आलेला असतो, पण वडिलांच्या विरोधाला न जुमानता अनुराधाला निर्मलशी लग्न करायचे असते. आता दहा वर्षांनंतर निर्मलचे अनुराधावर प्रेम असते का? तर नक्कीच असते. पण त्याचे खरे प्रेम असते त्याच्या रुग्णांवर, त्याच्या पॅशनवर. त्याला ध्यास असतो लोकांनी रोगमुक्त जीवन जगावे याचा. या त्याच्या पॅशनमुळे त्याच्या नकळत त्याचे आपल्या संवेदनशील कलाकार पत्नीकडे दुर्लक्ष होत असते. दहा वर्षांनंतर एकदा वडील येतात, त्यांनादेखील अनुराधाची आजची परिस्थिती दिसते. एकेकाळची खळखळून हसणारी, गाणारी अनुराधा आता मलूल झालेली दिसते. तिच्या आयुष्यातील आनंद हरवलेला असतो. कलासक्त मनाची घुसमट चालू असते. अनुराधाच्या मुलीला घेऊन ते शहरात निघून जातात. आता अनुराधा आणखी एकाकी होते.

पण याच वेळी कथानकात ट्विस्ट येतो. तिचा जुना प्रियकर दीपक (अभी भट्टाचार्य) अचानकपणे समोर येतो. अनुराधाची सद्यस्थिती पाहून तो चक्रावून जातो. दीपक अनुराधाला सल्ला देतो, या चार भिंतींमध्ये तुझ्या स्वप्नांना, तुझ्यातील कलावंत मनाला पुन्हा जिवंत कर. अनुराधा पुन्हा द्विधा मनःस्थितीत जाते. काय करायचे? इथे राहून आपल्याला काहीच करता येणार नाही याची तिला जाणीव होते आणि एक दिवस ती निर्णय घेते की, निर्मलला सोडून शहरात जायचे. निर्मल शांतपणे तिचा निर्णय एक्सेप्ट करतो. काहीच त्रागा करत नाही. काहीच नाही. फक्त तो आर्त स्वरात तिला एक विचारतो,“कामाच्या व्यापात मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले हे खरे आहे, पण मी तरी स्वतःकडे कुठे लक्ष दिले?” अनुराधा खाडकन आपल्या स्वप्नातून जागी होते. निर्मल निःस्वार्थपणे रुग्णांची सेवा करत असतो. त्याने खरोखरच स्वतःच्या आवडी निवडीकडे तरी कुठे लक्ष दिलेले असते? आता ती शांतपणे विचार करून त्याच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेते.

चित्रपटाचा हा शेवट त्या काळात काही लोकांना पटला नव्हता. हा पारंपरिक पुरुषसत्ताक पद्धतीला शरण जाण्याचा प्रकार आहे असे त्या काळात म्हटले जाऊ लागले होते. ऋषिकेश मुखर्जी मात्र यावर कुठलेही भाष्य करत नाहीत. तो निर्णय ते प्रेक्षकांवर सोडतात. चित्रपटाची बलस्थाने सांगायची तर सर्वच कलाकारांचा अतिशय भावस्पर्शी असा अभिनय. बलराजचा प्रश्नच नव्हता. अभिनेत्री लीला नायडूचा हा पहिला चित्रपट होता, पण कुठेही तिचा नवखेपणा यातून दिसत नाही (लीला नायडू ‘मिस इंडिया’ होती आणि जगातील दहा सुंदर स्त्रियांमध्ये तिची गणना होत होती). पंडित रविशंकर यांचे चित्रपटाला दिलेले संगीत हे अतिशय क्लास दर्जाचे होते. ‘जाने कैसे सपनो में खो गई अंखियां (रागः तिलक श्याम), सांवरे सांवरे (रागः भैरवी), ‘हाय कैसे दिन बिते कैसे बिती रतिया पिया जाने ना’ (रागः खमाज), ‘हाये रे वो दिन क्यूं न आये’ (रागः जन संमोहिनी) ही लताची चार गाणी अतिशय वरच्या श्रेणीची झाली होती. संपूर्ण चित्रपट आणि गाण्यांमधून पंडित रविशंकर यांची सुरेल सतार प्रेक्षकांची सोबत करत असते. चित्रपटाची गाणी लिहिली होती शैलेंद्र या प्रतिभावान गीतकाराने. खरं तर शास्त्राrय संगीताच्या सुरावटीवर शब्द लिहिणे खूप अवघड, पण हे काम शैलेंद्र यांनी सहजसुलभरीत्या केलेले दिसते. दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या तालमीत तयार झालेले ऋषिकेश मुखर्जी यांचा हा चौथा चित्रपट होता. यात त्यांनी वापरलेली प्रतीकं, फ्लॅशबॅकचा वापर आणि सिनेमाला दिलेली साधेपणाची समृद्धी प्रेक्षकांची पकड घेते.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

[email protected]