अदानीविरोधात गुरुवारी धारावीकरांचा विराट मोर्चा, म्हाडा कार्यालयावर देणार धडक

अदानी समूहाच्या वतीने करण्यात येणाऱया धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीकरांची घोर फसवणूक करण्यात येत असून अदानीची या प्रकल्पातून हकालपट्टी करण्यासाठी गुरुवार, 12 ऑक्टोबरला वांद्रे येथील म्हाडा कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. धारावीच्या टी जंक्शनपासून सकाळी 11 वाजता सुरू होणाऱया या मोर्चात धारावीकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती या मोर्चाचे निमंत्रक माजी आमदार आणि धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबूराव माने यांनी दिली.

अदानी समूह धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली एकूण 650 एकर जमिनीवरील 200 एकर जमिनीवर धारावीकरांना कोपऱयात वसवणार आहे. शिवाय सरकारने अदानीला 80 टक्के अधिकार दिल्यामुळे सरकारच्या हातातही काही राहिलेले नाही. धारावीत सुमारे 1 लाख 15 हजार झोपडीधारक असून प्रत्यक्षात केवळ 58 हजार जणांचेच पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे उर्वरित झोपडीधारकांना इथून हुसकावून लावण्यात येणार आहे. झोपडीधारकांच्या जिवावर अदानीला 4 चटई क्षेत्र दिले जाणार आहे. अदानीसाठी सरकारने पायघडय़ा घातल्या आहेत आणि धारावीकरांना दावणीला बांधले आहे, अशी खरमरीत टीका बाबुराव माने यांनी केली आहे. मोर्चात शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटिका श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, विधानसभा संघटिका कविता जाधव, शेकापचे राजू कोरडे, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे, धारावी भाडेकरू संघाचे अनिल कासारे, नितीन दिवेकर, बसपचे श्यामलाल जयस्वाल, आपचे संदीप कटके आदी सहभागी होतील.