‘बेस्ट’च्या ‘प्रीपेड मीटर्स’मुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड; अदानीसाठी टेंडरमध्ये पायघडय़ा घातल्याचा आरोप

मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ने ग्राहकांना ‘प्रीपेड’ मीटर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मीटर बसवण्याचे टेंडर अदानीला देण्यासाठी प्रशासनाने टेंडरमध्ये अटींच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पायघडय़ा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवाय 9500 रुपये किमतीचा मीटर असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंडही बसणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

वीज वितरण व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे ‘बेस्ट’ उपक्रमाकडून सांगण्यात आले. यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबवून अदानीला प्रीपेड मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले. सप्टेंबरपासून बेस्टच्या ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येणार आहेत. मात्र टेंडर अदानीला देण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत पावसाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला मिळालेल्या कंत्राटाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या निविदा प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे.

अदानी यांनी बोली लावताना पहिल्यांदा 1528 कोटी किंमत कोट केली होती. मात्र ती नंतर 228 कोटींनी कमी करून रुपये 1300 कोटी एवढी ठेवली. मात्र याउलट अशोका बिल्डकॉन यांनी रुपये 1300 कोटींचा प्रारंभिक कोट सादर केला होता. मात्र कंत्राट अदानीला देण्यात आले.