वर्ल्ड कपच्या तयारीसाठी डच हिंदुस्थानात

शेवटच्या क्षणी थरारक विजयाची नोंद करत आगामी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेला डचचा क्रिकेट संघ येत्या सप्टेंबर महिन्यात हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. मात्र तो या दौऱ्यात किती सामने खेळणार आहे आणि कोणाविरुद्ध खेळणार हे लवकरच जाहीर केले जाईल. डच म्हणजेच नेदरलॅण्ड्सचा संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरल्यानंतर ते एकही सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे आपल्या संघाला सराव मिळावा म्हणून ते वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांपूर्वी काही स्थानिक संघांविरुद्ध सराव सामने खेळणार आहेत.

त्यांचा संघ बंगळुरू येथे आपले अधिकृत सराव सामने खेळल्यानंतर हैदराबाद किंवा त्रिवेंद्रम येथे काही सराव सामने खेळतील, अशी माहिती नेदरलॅण्ड्सच्या क्रिकेट अधिकाऱयाने दिली. नेदरलॅण्ड्सचा संघ 6 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला तर 9 ऑक्टोबरला  न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळेल. हे दोन्ही सामने हैदराबादलाच खेळले जाणार आहेत. नेदरलॅण्ड्स पाचव्यांदा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला असून ते 2011 नंतर प्रथमच खेळतील.