फेसबुकवर मैत्री आणि मग बळजबरी, महिलेच्या तक्रारीवरून आरोपीला बेड्या

परळीत एका महिलेला फेसबुक वर मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. शहरातील एका महिलेने चॅटिंगमधील मैत्रीत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार केली आहे. या महिलेच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

येथील शारदानगर भागातील 32 वर्षीय महिलेने फेसबुकवर केलेल्या मैत्रीनंतर आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अकबर बबन शेख (वय 23 वर्षे रा. तेलगावनाका इंदिरारानगर बीड) याने फिर्यादी महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करून घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे गेली.

त्यानंतर आरोपीने याचा गैरफायदा घेत पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. आरोपीने महिलेच्या घरी जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच 13 मार्च 2023 रोजी तिच्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि पीडित महिलेला मारहाण केली.

मंगळवार 2 एप्रिल 2024 रोजी पीडितेच्या घरी कोणी नसताना सकाळी 9.40 वा. सुमारास आरोपी घरी आला. त्याने पीडितेला तु मला कॉल करून का बोलत नाहीस असे म्हणुन तिच्या अंगावर जावुन वाईट हेतूने हात पकडून महिलेचा विनयभंग केला. त्याला प्रतिकार करत असताना त्याने पीडितेला उचलून जमिनीवर आपटले.

त्यावेळी आरोपीने हातातील वस्तूने डोक्यात मारून जखमी केले. त्याने उजवा हात दाबुन धरल्याने हातातील बांगड्या फुटुन हातालाही जखम झाली आहे, अशा आशयाची फिर्याद दिल्यानंतर आरोपी अकबर बबन शेख (वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड) याच्याविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं 46/2024 कलम 376,354, 354 (D), 452,323,506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या गंभीर प्रकरणी पिंक पथक अंबाजोगाईच्या पो.उप.नि. प्रतिभा एम. शेटे, संभाजीनगर पो.नि. शेख, सपोनि प्रविण जाधव, पोअं. भगवान गुट्टे आदींनी पुढील तपास करीत आरोपी अकबर याला अटक केली आहे.