पंचायत फेम अभिनेत्री आंचल तिवारीसह आठ जणांचा अपघातात मृत्यू

बिहारमधील कैमूर येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये आंचल तिवारीसह तीन भोजपूरी कलाकारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या भयंकर अपघातात एकूण 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. मोहनिया पोलिस स्थानक हद्दीतील देवकाली गावाजवळील जीटी रोडवर रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. सोमवारी मृतांची ओळख पटली असून त्यामध्ये अभिनेत्री आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव सह भोजपूरी गायक विमलेश पांडे उर्फ छोटू पांडे याचा ही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याव्यतिरिक्त प्रकाश राम, दधिबल सिंह, अनु पांडे, शशी पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे अशी अन्य मृतांची नावे आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह आठ जणांना घेऊन जाणाऱ्या वाहनाने आधी दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. यानंतर एसयूव्ही आणि दुचाकी दोन्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले. समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक धडकल्याने दुचाकीस्वारासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.