मी तर व्हिस्कीचा फॅन! सरन्यायाधीश-वकिलांमध्ये कोर्टात रंगला मजेशीर संवाद

कोर्ट म्हटले की तिथे शांतता आली. आदेश, फटकारे नित्याचेच. सर्वोच्च न्यायालयातील वातावरण तर अधिक शिस्तीचे. याच न्यायालयात मंगळवारी होळीनिमित्त हलकेफुलके वातावरण होते. ‘औद्योगिक दारू’च्या प्रकरणात वकिलाचे रंगीत केस पाहून सरन्यायाधीशांनी प्रश्न केला अन् वकिलाने माफी मागितली. रंगीत केसांचे दारूशी काही देणेघेणे नसल्याची मिश्कील टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. त्यावर ‘मी तर व्हिस्कीचा फॅन आहे’ असे उत्तर वकिलाने दिले. हा मजेशीर संवाद ऐकून न्यायालयात एकच हशा पिकला.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय खंडपीठापुढे ‘औद्योगिक दारू’शी संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीशांनी रंगीत केसाबद्दल ज्येष्ठ वकिलाला प्रश्न केला. सुरुवातीला या प्रश्नामुळे ज्येष्ठ वकील हादरून गेले. त्यांनी लगेच माफी मागितली. ‘हे होळीमुळे घडले. जेव्हा आपल्या आजूबाजूला बरीच मुले व नातवंडे असतात तेव्हा असे घडते,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हसून विचारले, ‘याचा दारूशी काही संबंध नाही ना?’ त्यावर वकिलांनी हसतहसत उत्तर दिले, ‘हा हा… तसा संबंध आहे. मी व्हिस्कीचा फॅन आहे.’ सरन्यायाधीश व वकिलांमधील या मजेशीर संवादामुळे संपूर्ण कोर्टरूममध्ये काहीकाळ हास्यकल्लोळ पाहायला मिळाला

n यापूर्वी दोन दारू पंपन्यांतील ट्रेडमार्क उल्लंघनाच्या वादाच्या सुनावणीदरम्यान मजेदार किस्सा घडला होता. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बाटल्या आणल्या होत्या. त्यावेळीही सरन्यायाधीश आणि अॅड. रोहतगी यांच्यातील संवाद चर्चेचा विषय बनला होता.