क्रूरतेचा कळस! प्रेयसीसाठी पित्याने चिमुरड्यांना 15 व्या मजल्यावरून फेकून मारलं

प्रेयसीच्या अटीखातर एका पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांना 15 व्या मजल्यावरून फेकून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला स्वत:ची मुलं हवी होती. त्यामुळे तिने दुसऱ्या महिलेच्या मुलांची पालनपोषण करणार नाही अशी प्रियकरासमोर अट ठेवली होती. यातूनच हे कृत्य घडले.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, गतवर्षी 2 नोव्हेंबर रोजी चीनच्या चोंगकिंग नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या टॉवर ब्लॉक वरून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. झांग रुईशू (वय -2 वर्ष) आणि झांग यांगरुऊ (वय – एक वर्ष) अशी दोघांची नावे असल्याचे समोर आले. रुईशूचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता, तर यांगरुईचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. सुरुवातीला हे दोघे खेळताखेलता पडले असावे असे वाटले होते. परंतु पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मृत मुलांचे वडील झांग बो याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले.

झांग बो याचा पत्नीशी घटस्फोट झाला होता. त्याची पत्नी दोन्ही मुलांना सोडून गेली होती. यानंतर झांग याचे ये चेंगशेन या तरुणीशी सूत जुळले आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र प्रेयसीने दोन्ही मुलांना स्वीकारण्यास नकार दिला. जोपर्यंत मुलं दूर जात नाही तोपर्यंत आपण विवाह करणार नाही अशी अटच ये चेंगशेन हिने घातली.

याबाबत झांग बो याची पत्नी चेन मेईलिन हिने सांगितले की, आमचा घटस्फोट होण्याच्या आधीपासून त्याचे चेंगशेन हिच्याशी संबंध होते. त्यामुळे त्याने मला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर काही दिवसांनी न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे आणि मुलगा सहा वर्षांचा होत नाही तोपर्यंत त्याचा ताबा वडिलांकडे ठेवण्याचा निर्णय घेतला.

ही बाबत चेंगशेन हिला कळताच तिने धिंगाणा घातला. लाईव्ह व्हिडीओ कॉलदरम्यान तिने आपल्या हाताची नसही कापली. यामुळे व्यथित झालेल्या झांगने कोणताही मागचापुढचा विचार न करता दोन्ही मुलांना रागाच्या भरात 15 व्या मजल्यावरून खाली फेकले. पोलीस चौकशीमध्ये त्याने आपला गुन्हाही कबूल केला. अखेर 28 डिसेंबर रोजी झांग आणि त्याची प्रेयसी चेंगशेन हिला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.