303 हिंदुस्थानी प्रवासी असलेले विमान फ्रान्सने केले जप्त, मानवी तस्करीचा संशय

हिंदुस्थानी नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमान फ्रान्सने ताब्यात घेतले असून या विमानात 303 हिंदुस्थानी नागरिक असल्याची माहिती आहे. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिकाऱयांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदुस्थानने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

रोमानियन चार्टर कंपनीच्या या विमानाने गुरुवारी सकाळी संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते. विमान ताब्यात घेण्यात आल्यानंतर प्रवाशांची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मानवी तस्करीच्या संशयावरून तपास सुरू असून चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हिंदुस्थानी दूतावासाला याबाबत कळवण्यात आले असून दूतावासाचे पथक घटनास्थळी पोहचले आहे.