केवायसी अपडेटच्या नावाखाली लावायचा चुना

बँक केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या हुसेन अन्सारी याला बोरिवली पोलिसांनी झारखंड येथून बेडय़ा ठोकल्या. तो आणि त्याचा भाऊ हे दोघे मिळून नागरिकांना चुना लावत होते. हुसेन हा ऑनलाइन फसवणूक कशी करायची याचे शिक्षण घेत होता. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले.

तक्रारदाराला फेब्रुवारी महिन्यात त्यांना एकाचा फोन आला. तुमचे बँकेचे केवायसी अपडेट करा असे त्यांना सांगितले. फसवणुकीच्या फोनबाबत त्यांनी त्यांच्या भावाला माहिती कळवली. काही वेळाने त्याच्या खात्यातून एक रुपया काढला. ठगाने त्याचा तीन दिवस अधूनमधून मोबाईल हॅक करून खात्यातून दोन लाख रुपये काढले.

खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच त्याने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील उपनिरीक्षक कल्याण पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे झारखंड येथे गेल्याचे उघड झाले. पोलिसांचे पथक झारखंडच्या पालाजोरी या गावात गेले. तेथे खबऱयाच्या मदतीने पोलिसांनी हुसेनला ताब्यात घेऊन अटक केली. हुसेनचे इयत्ता सहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो आणि त्याचा भाऊ हा दोघे मिळून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करायचे. हुसेनदेखील झारखंड येथील एका गावात ऑनलाईन फसवणूक कशी करायची याचे प्रशिक्षण घेत होता. फसवणुकीचे पैसे त्याने काही जणांच्या खात्यात वर्ग केले होते.