जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण; मिर्झा बेगला जामीन

2010 मधील पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या मिर्झा हिमायत बेगला उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) झटका बसला आहे. बेग 13 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येणार आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीच्या आवारात 13 फेब्रुवारी 2010 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. त्यात पाच परदेशी नागरिकांसह एकूण 17 जण ठार झाले होते. याप्रकरणी एटीएसने 7 सप्टेंबर 2010 रोजी बेगला अटक करीत त्याच्या उदगीर येथील घरातून जवळपास 1.2 किलो आरडीएक्स जप्त केले होते. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर सुनावणी पूर्ण करुन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 19 डिसेंबरला निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी तो निर्णय जाहीर करीत खंडपीठाने बेगला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे निर्देश दिले. तसेच बेगने एटीएसच्या नाशिक कार्यालयात हजेरी लावावी आणि नाशिक बाहेर जाऊ नये, अशी अट घातली आहे.