शिकस्त करूया, मतदार नोंदणीत पुन्हा सक्रिय होऊ या! युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखांचे आवाहन

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सध्या मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघात 96 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 15 हजार मतदार नोंदले गेले आहेत. मतदार नोंदणीचा पुढचा टप्पा 23 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यातही प्रयत्नांची शिकस्त करूया, मोठ्या संख्येने नोंदणी करूया आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख यांचा निष्ठावंत सैनिक विधान परिषदेत पाठवूया, असे आवाहन युवासेना कोकण विभागीय सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे.

युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख शिरसाट यांनी म्हटले आहे की, मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली. पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधून नोंदणी कार्यक्रम राबविला. सोशल मीडियावर जागृती केली. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून नोंदणी होणाऱ्या मतदारांचे प्रमाण अधिक होते. शिवसेनेची आघाडी पाहून इतर पक्ष नंतर सक्रिय झाले आणि मतदारसंघात विक्रमी नोंदणी झाली. या विक्रमी नोंदणीचे श्रेय सामान्य शिवसैनिकांचे आहे.पहिल्या टप्प्यातील हा धडाका आपल्याला पुढच्या टप्प्यातही कायम ठेवायचा आहे. आज शिवसेनेला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. काही आमदार निघून गेले असले तरी संपूर्ण कोकण पट्ट्याने शिवसेनेला साथ दिली आहे. असे प्रसंग शिवसेनेने यापूर्वी अनेकवेळा पाहिले आहेत. हा प्रकार शिवसेनेला नवा नाही. यातून आम्ही पुन्हा उजळून निघू. त्यासाठी आज पक्षाला आणि संघटनेला योगदान देण्याची आवश्यकता आहे.

डावखरे यांच्या रूपाने अत्यंत निष्क्रिय आमदार पदवीधर मधून निवडून गेले. कोकणच्या पदवीधरांना त्यामुळे कुणीच वाली उरला नाही. ती चूक टाळायची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,खासदार विनायक राऊत, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांना तरुणांच्या विशेषतः कोकणातील तरुणांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्यांना ताकद देण्यासाठी कोकणातून त्यांच्या विश्वासातील माणूस विधान परिषदेत पाठविणे आवश्यक आहे, त्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे. नोंदणीचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी झाला. आता दुसऱ्या टप्प्याची नोंदणी सुरु होणार आहे. त्यासाठी उंबरा न उंबरा पिंजून काढूया, प्रत्येक पदवीधराशी संपर्क साधूया आणि नोंदणी करून शिवसेनेला ताकद देऊया, असे आवाहन जिल्हाप्रमुख शिरसाट यांनी शिवसैनिक, युवासैनिकांना केले आहे.