युरोप आणि अमेरिकेचे चीनशी संबंध ताणले गेल्याचा फायदा, निर्यात वाढण्याची अपेक्षा

अमेरिका आणि युरोपातील काही देशांचे चीनशी संबंध ताणले गेलेले आहेत. यामुळे सी प्लस 1 हे व्यावसायिक धोरण उदयास आले. याचा फायदा गोदरेज सिक्युरिटीज सारख्या कंपन्यांना होताना दिसत आहे. आतापर्यंत चीनमधून आयात होणाऱ्या गोष्टी आता इतर देशांकडून घेण्याकडे अमेरिका आणि युरोपातील देशांचा कल वाढायला लागला आहे. यामुळे मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठीच्या उपकरणांच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. गोदरेज सिक्युरिटीबाबत बोलायचे झाल्यास युरोप आणि अमेरिकेच्या एकूण बाजारापैकी 40 टक्के हिस्सा हा या हिंदुस्थानी कंपनीने व्यापला आहे. हा हिस्सा आणखी वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत असून सी प्लस वन धोरणामुळे त्याला यश मिळण्यास मदत होईल असे गोदरेज सिक्युरिटी सोल्युशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुष्कर गोखले यांनी सांगितले. युरोपातील काही देशांमध्ये निर्माण झालेली अस्थिरतेची परिस्थिती यामुळेही मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठीच्या उपकरणांना असमारी मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थानाबाबत बोलायचे झाल्यास देशातील शहरांमध्ये मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठीच्या उपकरणांची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. एका घरासाठी 2 किंवा 3 तिजोऱ्या घेतल्याचेही आम्हाला दिसून आल्याचे गोखले यांनी सांगितले. मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठीची उपकरणे, तिजोऱ्या कशा असाव्या हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही गोष्टींमध्ये बदल करत तर काही गोष्टी नव्याने आणत काही उत्पादने गोदरेज सिक्युरिटीने तयार केली आहेत. यातल्या 3 उत्पादनांचे बुधवारी अनावरण करण्यात आले. आधुनिक तिजोऱ्या या AI आणि IOT तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात येत आहेत. IOT तंत्रज्ञानाचा वापर केल्याने जर तिजोरी फोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर घर मालकाला तत्काळ मेसेज जातो आणि अलार्म वाजण्यास सुरुवात होते. दुसऱ्या एका तिजोरीमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे की कोणी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला तर यंत्रणेतून धूर निघतो आणि त्यामुळे काहीच दिसेनासं होतं. हा धूर 40-45 मिनिटे तसाच राहतो. गोदरेज सिक्युरिटी नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करता यावीत यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असते. ग्राहकांचा किंमती ऐवज चोरी होऊ नये, चोरांपासून त्यांना संरक्षण मिळावं या उद्देशाने गोदरेज सिक्युरिटी सातत्याने प्रयत्नशील असते.

सी प्लस वन धोरण म्हणजे काय ?

ही एक व्यवसाय पद्धती आहे ज्याचा साध्या शब्दात अर्थ सांगायचा झाल्यास फक्त चीनमध्ये गुंतवणूक न करता हिंदुस्थानासारख्या वेगाने आर्थिक पातळीवर प्रगती करणाऱ्या देशांमध्ये ही गुंतवणूक करावी आणि या गुंतवणुकीतून त्या देशात उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा.