‘गोकुळ’च ‘अमूल’शी टक्कर देईल – हसन मुश्रीफ

ज्यांनी आपआपले दूध संघ संपविले, त्यांनीच शासनाकडून गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान ‘गोकुळ’ला देण्यास विरोध केला होता. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विरोध हाणून पाडत, ‘अमूल’शी टक्कर देण्यासाठी ‘गोकुळ’ हाच राज्याचा एकमेव ब्रॅण्ड करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

गोकुळ दूध संघाने प्रतिदिन 17 लाख 50 हजार लिटर दूधसंकलनाचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रकल्पस्थळी आयोजित अमृतकलशपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, ‘आज केवळ गोकुळ दूध संघच गायीच्या दुधाला सर्वाधिक दर देत आहे. प्रतिदिन सुमारे साडेतीन लाख लिटर दुधाची पावडर करून प्रतिलिटर साडेपाच रुपयांचा तोटा होत आहे. तरीसुद्धा गायीचे दूध स्वीकारत आहे. आजपर्यंत सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या जोरावरच गोकुळ दूध संघाने राज्यात एक वेगळा नावलौकिक मिळविला आहे. महाराष्ट्रातील एकमेव ‘गोकुळ’ ब्रॅण्ड हाच ‘अमूल’शी टक्कर देण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’मधील सत्तापरिवर्तनानंतर तीन वर्षांपूर्वी प्रतिदिन 20 लाख लिटर दूधसंकलनाच्या उद्दिष्टाचा केलेला संकल्प निश्चितच साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करीत, ‘गोकुळ’ हाच महाराष्ट्राचा एकमेव ब्रॅण्ड होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर, ‘चेअरमन गोठय़ाद्वारी’ अभियानातून ‘गोकुळ’च्या सर्व सुविधांचा उपयोग दूधवाढीसाठी झाला, म्हणूनच आज एकमेव ‘गोकुळ’कडून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार दूध उत्पादन केले जात असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.