सत्तेचा गैरवापर हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य; शरद पवार यांचा घणाघात

सत्तेचा गैरवापर हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. लोकशाहीत टीका करायचा अधिकार आहे. माझ्यावर, मोदींवर, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर एखादे धोरण मान्य नसेल तर टीका करायचा अधिकार लोकशाहीमध्ये सगळ्यांना आहे. परंतु काही लोकांनी त्यांच्या धोरणावर टीका केली, तर मोदी सरकराने त्यांना अटक केली. या देशाला संसदीय लोकशाही पद्धतीपासून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला नेण्यासंबंधीचा संकल्प केलेला दिसतोय. देशाच्या लोकशाहीचा मुलभूत अधिकार कोणी उद्ध्वस्त करत असेल तर तुम्हाला, आम्हाला एकत्र येऊ संघर्ष करावा लागेल, असे घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थनार्थ शेवगाव येथे आयोजित सभेमध्ये बोलत होते.

कांदा निर्य़ातीच्या मुद्द्यावरूनही शरद पवार यांनी मोदी सरकावर निशाणा साधला. कांदा हे जिराईत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि दोन पैसे खात्रीने मिळवून देणारे पिक आहे. हा कांदा आपण देशात आणि विदेशातही पाठवतो. यंदा उत्पादनही ठीक होते, मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. त्यामुळे शेतकऱ्याची दोन पैसे मिळवायची संधीही गेली. अनेक ठिकाणी लोकांनी मागण्या केल्यानंतर गुजरातच्या शेतकऱ्यांचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली. गुजरातचा शेतकरी आमचा शत्रू नाही, पण गुजरातच्या शेतकऱ्याला परवानगी आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याने काय घोडे मारले? असा सवाल शरद पवार यांनी केला. त्यानंतर आंदोलन झाल्याने दोन दिवसांनी काहीतरी निर्णय घेण्यात आला, असेही ते म्हणाले.

देशात ऊस, साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. आपण ऊसापासून साखर करतो, मळीपासून मोलॅसिस करतो, मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करतो. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स केले जाते आणि त्यामुळे वाहनाचे प्रश्न कमी होतात. त्यासाठी हा धंदा अत्यंत महत्त्वाचा आहे. ऊसावर मर्यादा, साखरेच्या किमतीवर मर्यादा, इथेनॉल तयार करायचंच नाही, ही भूमिका. शेवटी फारच चळवळ झाली, दंगा झाला. मागण्य केल्या. तर या आठवड्यामध्ये काही गोष्टींची धोरणं ही बदलायचा निकाल केंद्र सरकारने केलेला आहे. आणि ही उदाहरणं मी यासाठी सांगतोय की हे सरकार घाम गाळून, काळ्या आईशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन केलं, त्याला न्याय देण्यासाठी हे सरकार नाही याउलट तुमच्या सगळ्यांच्या यातना कशा वाढतील, याची भूमिका आजचे राज्यकर्ते घेतायेत, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

…म्हणून फडणवीसांनी काँग्रेसला मतदान करावे; कोरोना लसीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा टोला

ते पुढे म्हणाले की, सत्ता हातात असेल तर त्याचा वापर लोकांसाठी केला जातो. आज केंद्रातील सत्ता मोदींच्या हातात आहे. काय निर्णय त्यांनी गेल्या 10 वर्षात घेतले? नोटाबंदी केली. काय झालं नोटाबंदी करून? काही दिवस लोक बँकांच्या दारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटा बदलायला रांगेत उभे होते. एकट्या महाराष्ट्रात नोटबंदीच्या काळात रांगेत उभे राहिलेले 700 लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या नोटाही बदलल्या नाहीत, त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल म्हटलं. काळा पैसा बाहेर आला? शेतकऱ्याच्या, सामान्य माणसाच्या खिशात काही रक्कम पडेल असं म्हंटले, पण एक दमडी त्यांच्या खिशामध्ये पडलेली नाही.

गद्दारांना गाडणार, निष्ठावंतांची मशाल! राजन विचारे हॅटट्रिक मारणार!! आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास