शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरूवात, तीन दिवस चालणार उत्सव

शिर्डीत साईबाबांच्या हयाती पासून सुरू झालेल्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ झाला असून राज्याभरातून अनेक पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईबाबांना गुरुस्थानी मानणारे लाखो भाविक पुढील तीन दिवसात साई समाधीसमोर नतमस्तक होणार असून शिर्डीत भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.

आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी विणा घेऊन, तर मा. जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍श्री. सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे व संस्‍थान संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.