हरयाणात अभूतपूर्व हिंसाचार, 4 जिल्ह्यांत कर्फ्यू लागू

हरयाणातील नूंह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या मेवात ब्रजमंडल यात्रेदरम्यान सोमवारी अभूतपूर्व हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मंगळवारीही या हिंसाचाराची धग इथल्या नागरिकांना सहन करावी लागत होती. नूंहमधील बडकली चौक, पिनगवां, पुन्हाना, फिरोजपुर झिरका आणि तावडू शहरातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी नूंहमध्ये निघालेल्या शोभा यात्रेदरम्यान हिंसाचार उसळला होता. या हिसाचारात असंख्य वाहनांची तोडफोड करण्यात आली, दगडफेक झाली आणि गोळीबारही झाला. या हिंसाचारात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. इतली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी शहरात सतत गस्त घालण्यास सुरूवात केली आहे. पोलीस दलाचे जवळपास 1800 ते 2000 जवान रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत.

पोलिसांनी शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांची आणि जाळपोळ करणाऱ्यांची पोलिसांनी ओळख पटवण्यास सुरूवात केली असून त्यांना धडा सिकवण्याचा पोलिसांनी चंग बांधला आहे. गुरुग्राम, फरीदाबाद रेवाडी आणि नूंहमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या हिंसाचारामुळे हरयाणाच्या सीमेपासून जवळ असलेल्या राजस्थान तसेच दिल्लीतील जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आले आहेत. गुरुग्राम आणि फरीदाबादमधील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.

सुरुवात कुठून झाली

ब्रजमंडल यात्रेदरम्यान जलाभिषेकासाठी मोनू मानेसर हा देखील सहभागी होणार असल्याचं कळालं होतं. मोनू हा राजस्थानातील नासिर जुनैद याच्या हत्येतील आरोपी आहे. तो सामील होणाऱ असल्याचे कळाल्यानंतर वादाला सुरूवात झाली आणि हिंसाचार उसळला. दंगलखोरांनी एका मंदिरालाही घेरलं होतं. यामुळे मंदिरात अनेकजण अडकले होते. या भाविकांची नंतर सुटका करण्यात आली. दंगलखोरांमी केलेल्या दगडफेकीत 2 होमगार्डचा मृत्यू झाला आहे.