वादळी वाऱयाने झाडाखाली आंब्यांचा सडा; मोही परिसरातील शेतकऱयांचे प्रचंड नुकसान

माण तालुक्यातील मोहीसह परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वाऱयाने अनेक ठिकाणी झाडे पडली, तर वाडय़ा-वस्त्यांवर विजेचे खांब पडले असून, विजेच्या तारा लोंबकळत आहेत. परिसरात आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, वादळी वाऱयाने झाडाखाली आंब्याचा सडा पडला आहे. विक्रीसाठी तयार आंबे वादळी वाऱयाने पडल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. तर महालक्ष्मी यात्रेत आलेल्या व्यावसायिक दुकानांचेही मोठे नुकसान झाले.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली. रात्री नऊच्या सुमारास वाऱयाचा वेग वाढतच गेला. प्रचंड विजांचा कडकडाट; पण पाऊस कमी व वादळी वारेच जास्त असल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी मोही गावाची महालक्ष्मी देवीची यात्रा असल्याने मंगळवारी संध्याकाळी यात्रेची जय्यत तयारी सुरू होती. हॉटेल, मेवा मिठाईची दुकाने, खेळण्याची दुकाने असे अनेक व्यावसायिक या यात्रेत आले होते. अनेक लहान-मोठे व्यावसायिक आपली दुकाने थाटत होते. पण अचानक आलेल्या वादळी वाऱयाने दुकानांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱयाचा वेग इतका होता की मेवा मिठाई, खाद्यपदार्थ, खेळणी, कपडे अशा अनेक वस्तू अक्षरशः अस्ताव्यस्त विखुरल्या होत्या. अनेकांची पाले, पावसाळी कागद उडून गेले. दुकानांचे नुकसान झाल्याने व्यावसायिक हतबल झाले होते.

सततच्या दुष्काळामुळे मोही परिसरातील अनेकजण डाळिंब, आंबा , चिकू आदी फळबागेकडे वळले आहेत. अनेक शेतकऱयांनी आंबा लागवड केली आहे. परिसरात गेल्या चार वर्षांपासून आंबाविक्री सुरू आहे. या विक्रीतून शेतकऱयाच्या खिशाला आधार मिळत असून, पोटच्या मुलाप्रमाणे आंब्याच्या बागा जपल्या जात आहेत. पण अचानक झालेल्या वादळी वाऱयाने विक्रीयोग्य आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱयामुळे झाडाखाली आंब्याचा सडा पडला असून, शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

विजेचे खांब पडले

 मोही परिसरात अचानक झालेल्या वादळाने झाडे पडली आहेत. विजेचे खांबही पडले असून, ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केला आहे. सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून, परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. वीज मंडळाने त्वरित दुरुस्ती करून नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

वादळी वाऱयाने तीन एकर आंबा बागेचे नुकसान झाले असून, झाडाखाली आंब्याचा सडा पडला आहे. शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी.

– शिवाजी देवकर, शेतकरी, माजी पोलीस उपनिरीक्षक, मोही.