पंतप्रधान मोदींना मातृशोक, हिराबेन मोदी यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. त्या 100 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास हिराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल देशविदेशातील अनेक नेत्यांनी, मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

जून महिन्यात हिराबेन मोदी यांचा शंभरावा वाढदिवस झाला होता. अस्वस्थ वाटू लागल्याने 28 डिसेंबरला यू. एन. मेहता इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले होते. त्याचदिवशी पंतप्रधान मोदी आईला भेटण्यासाठी अहमदाबादला आले होते. गुरुवारी दुपारी डॉक्टरांनी हेल्थ बुलेटीनमध्ये हिराबेन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले होते. मात्र, मध्यरात्रीनंतर प्रकृती बिघडली. शुक्रवारी पहाटे 3.30 च्या सुमारास हिराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवली.

हिराबेन यांच्या मागे पाच मुले पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमाभाई, अमृतभाई, प्रल्हादभाई  व पंकजभाई आणि एक मुलगी वासंतीबेन, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.

आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी तातडीने गांधीनगर येथे आले. रुग्णालयातून पार्थिव घरी आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी घराबाहेर मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधान मोदींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला. पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधून प्रवास केला. पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबेन यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झाले

पंतप्रधान मोदी यांनी आईच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. आई हिराबेन यांच्या हातामध्ये दिवा असलेला फोटो  शेअर करत ट्विट केले आहे. ‘एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झाले. आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तींचा अनुभव घेतला. ज्यात एक तपस्वीची यात्रा, निष्काम कर्मयोगाचे प्रतीक आणि मूल्यांसाठी कटिबद्धता दिसून आली, असे मोदी यांनी म्हटले आहे. 100 व्या वाढदिवसानिमित्त आईला भेटलो होतो तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे ‘बुद्धीने काम करा आणि शुद्धपणे आयुष्य जगा,’असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ममता बॅनजींनी शोक व्यक्त केला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘पंतप्रधान मोदी आज आपल्यासाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. मी प्रार्थना करते की, हे दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला लाभो.

 

नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला तीव्र दुःख झाले. कधीही भरून न निघणारी ही हानी आहे. माझ्या सहवेदना आपल्यासोबत आहेत. हिराबेन यांच्या आत्म्यास  चिरशांती लाभो हीच प्रार्थना.

 शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष)

 आईच्या अंत्यसंस्कारानंतर तासभरातच पंतप्रधान पुन्हा देशसेवेत

आई हिराबेन यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुःखातून स्वतःला सावरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. पश्चिम बंगाल येथील हावडा आणि न्युजलपायगुडीला जोडणाऱया वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी सकाळी 11.15 च्या सुमारास हिरवा पंदील दाखविला. आईच्या निधनामुळे मोदींना पश्चिम बंगालला जाता आले नाही. मात्र, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी संवादही साधला. हावडा स्टेशनवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.

आईचे छत्र हरपणे यासारखी  वेदना नाही

उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली!

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मातेचे छत्र गमावले ही बातमी अत्यंत दुःखद आहे. मातोश्री हिराबेन या 100 वर्षांचे समृद्ध आयुष्य जगल्या. पुत्र देशाच्या पंतप्रधानपदी बसल्याचे त्यांना पाहता आले. एका कर्तबगार पुत्राची माता म्हणून त्यांना गौरव प्राप्त झाला. त्यांचे जीवन तरीही साधे व त्यागमय होते. नरेंद्र मोदी व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईचे छत्र हरपणे यासारखी वेदना नाही. या दुःखातून सावरण्याचे बळ नरेंद्र मोदी व त्यांच्या परिवारास मिळो. मातोश्री हिराबेन यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या सहवेदना आणि प्रेम मोदी यांच्या परिवारासोबत आहेत.

राहुल गांधी (काँग्रेस नेते)