वैभव राऊतला हायकोर्टाने दिला जामीन, नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊतला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैभव राऊतला 2018मध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. तब्बल पाच वर्षांनी वैभव राऊतला जामीन मंजूर झाला आहे.

वैभव सनातन संस्थेचा साधक आहे. वैभवच्या नालासोपारा येथील घरातून 20 जिवंत गावठी बॉम्ब, 2 जिलेटीन कांडय़ा, 4 इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, 22 नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, पॉयझन लिहिलेल्या 1 लिटरच्या दोन बाटल्या व वेगवेगळी स्फोटक पावडरची पाकीट एटीएसने जप्त केली होती. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी दहशतवादी कट रचल्याचा वैभववर आरोप होता.

गेल्या वर्षी वैभवने जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. याचा खटला सुरू आहे. पण खटला कधी संपेल याची शाश्वती नाही. आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी वैभवने केली होती. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने वैभवला सशर्त जामीन मंजूर केला. वैभवकडून ऍड. सना खान यांनी बाजू मांडली तर राज्य शासनाकडून ऍड. प्राजक्ता शिंदे यांनी युक्तिवाद केला.