तरुणाच्या आत्महत्येचा नव्याने तपास करण्यास हायकोर्टाचा नकार

भांडुप येथील ब्युटी हाईटस् इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. याचा तपास पूर्ण होऊन त्याचा अहवालही पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात सादर केला. या आत्महत्येची स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत नव्याने चौकशी करावी, ही त्या तरुणाच्या वडिलांची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली नाही.

सोहम भट्टाचार्य असे आत्महत्या करणाऱया तरुणाचे नाव आहे. त्याचे 63 वर्षीय वडील स्वपन यांनी सोहमच्या आत्महत्येचा नव्याने तपास करण्यासाठी याचिका केली होती. न्या. अजय गडकरी व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली.

काय आहे प्रकरण
सोहम भांडुप येथील ब्युटी हाईटस् इमारतीत एकटाच राहत होता. 2 मे 2017 रोजी मध्यरात्री 3 वाजता सोहमला पह्न आला. त्यानंतर तो तणावात होता. त्याने 18 व्या मजल्यावरील घरातून उडी टाकून आत्महत्या केली, अशी तक्रार इसा मोहम्मद गजवानी यांनी पोलिसांत केली.

सोहमच्या वडिलांचा दावा
घटनेच्या दिवशी सोहमसोबत असलेल्या सिद्धार्थ तोडी या महत्त्वाच्या साक्षीदाराचा जबाब दोन वर्षांनी पोलिसांनी नोंदवला. अन्य तिघे मित्र सोहमसोबत होते. त्यांचा जबाब तत्काळ नोंदवण्यात आला नाही. पोलिसांनी हा तपास योग्य प्रकारे केलेला नाही. याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करावी, अशी मागणी स्वपन यांच्याकडून करण्यात आली.