पावसाने उसंत घेताच वीज तापली! मुंबईची दैनंदिन मागणी 3200 मेगावॅटवर

जुलैमध्ये धुवाधार कोसळलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे उकाडा वाढू लागल्याने एसी, पंख्यांनी पुन्हा वेग घेतल्याने गेल्या चार दिवसांत मुंबईच्या विजेच्या मागणीतही मोठी वाढ नोंदली आहे. आज सुट्टीचा दिवस असतानाही मुंबईची मागणी तब्बल 3156 मेगावॅटवर पोहचली आहे. तसेच राज्यातील विजेची मागणी 25 हजार 400 हजार मेगावॅटच्या पुढे गेल्याने वीजनिर्मिती कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आहेत.

मुंबई शहरात बेस्टकडून तर उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरकडून वीज पुरवठा केला जातो. उन्हाळय़ात मुंबईची कमाल मागणी 3956 मेगावॅट एवढी विक्रमी नोंदली होती. मात्र मान्सूनचे आगमन होताच मुंबईची विजेची मागणी दोन हजार मेगावॅटने खाली आली होती. मात्र आता पुन्हा पावसाने ओढ देताच मुंबईच्या विजेच्या मागणीत झपाटय़ाने वाढ होऊन 3156 मेगावॅटवर गेली आहे. टाटा पॉवरने 1181 मेगावॅट, अदानी इलेक्ट्रिसिटीने 487 मेगावॅट तर एक्स्चेंजमधून सुमारे 1700 मेगावॅट वीज घेतली आहे. तर राज्यभरात कृषिपंपांचा वीज वापर वाढल्याने महावितरणकडे नोंदली जाणारी विजेची मागणी 22 हजार मेगावॅटच्या पुढे गेली आहे. दरम्यान, विजेची मागणी वाढल्याने कोयना वीज केंद्रातून जवळपास दीड हजार मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती केली जात आहे.

एक्स्चेंजमधील विजेचा दर वाढला

सध्या महाराष्ट्राबरोबरच अनेक राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वत्र विजेच्या मागणीत वाढ नोंदली जात आहे. अचानक वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे एरवी केंद्रीय एक्स्चेंजमधून दीड-दोन रुपये प्रतियुनिट दराने मिळणाऱया विजेचा दर आता साडेचार-पाच रुपयांवर गेला आहे.