आप पक्ष म्हणजे ‘आरएसएस का छोटा रिचार्ज’, ओवेसींच्या टीकेला आपचे उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘सुंदरकांड’ पाठचे आयोजन केले आहे. ‘आप’चे सगळे नेते या धार्मिक कार्यक्रमात सामील होणार आहेत. ‘आप’च्या या निर्णयावर एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. ‘आरएसएस का छोटा रिचार्ज’ अशा शब्दात त्यांनी आपवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आपने उत्तर दिले आहे.

ओवेसींना उत्तर देताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटले की, मी हनुमानाकडे प्रार्थना करेन की ओवेसींनाही त्यांनी आशीर्वाद द्यावा. कोणत्याही पक्षाला सुंदरकांडसारख्या चांगल्या कार्यक्रमावर आक्षेप नसावा, कोणाला आक्षेप असेल तरही वाईट गोष्ट आहे.

भारद्वाज यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे अथवा नाही याची कल्पना नाही. मात्र दिल्ली सरकार राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करत आहे. भारद्वाज यांनी म्हटले की, नेते कुठल्या ना कुठल्या धर्माचे असतात. त्यांचा धर्मावर विश्वास आहे. यामध्ये कोणतीही अडचण नाही. प्रत्येकाने ते करावे. काही लोक तर निवडणुका होत असल्याने अपूर्ण असलेल्या मंदिराचे उद्घाटन होत असल्याचेही म्हणत आहेत. पण आमचा निषेध नाही प्राणप्रतिष्ठा होत असेल तर की करावी.