संक्रमण शिबिरातील घरे विकाल तर तुरुंगात जाल; संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा म्हाडाचा निर्णय

संक्रमण शिबिरातील घरे परस्पर विकून म्हाडाची फसवणूक करणाऱयांची आता काही खैर नाही. अशा व्यक्तींविरोधात फसवणूक आणि आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरातील घरे विकणाऱयांचे धाबे दणाणले आहे.

म्हाडा इमारतीचा पुनर्विकास करताना रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित रहिवाशांना संक्रमण शिबिरात तात्पुरते घर दिले जाते. संक्रमण शिबिरात घर घेतलेल्या रहिवाशाला त्याची गरज नसेल किंवा त्याची पुनर्विकसित इमारत तयार होऊन घराचा ताबा घेतला असेल तर त्यांनी आपल्या ताब्यात असलेले संक्रमण शिबिरातील घर म्हाडाला परत करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र काही व्यक्ती परस्पर या घराची विक्री करून म्हाडाची आर्थिक फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विकलेले घर परत मिळवताना म्हाडाला कायदेशीर कारवाई करावी लागते. त्यात वेळ आणि पैसा खर्च होतो.

ज्या रहिवाशाने जाणीवपूर्वक संक्रमण शिबिरातील घर विकून म्हाडाची फसवणूक केली आहे त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 405, 406 अन्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे.
– विनीत अगरवाल, मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी