मुंबईचा मॅनेजमेंट गुरू संकटात, पाच हजारांपैकी केवळ दीड हजार डबेवाले उरले

कोरोना महामारीमुळे कामाची पद्धत बदलली असून अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच ऑनलाईन डिलिव्हरीचे प्रमाण वाढले असून शाळांबरोबरच कार्यालयांमध्येही आता कॅण्टीन सुरू करण्यात आली आहेत. त्याचा थेट फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. त्यांच्या रोजगारावर संकट आले आहे. त्यामुळे त्यांची संख्या रोडावत चालली असून सुरुवातीला पाच हजार एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेले डबेवाले आता दीड हजारच शिल्लक राहिले आहेत. 

डबेवाल्यांची मॅनेजमेंट गुरू अशी जगभर ओळख आहे. हाच मुंबईचा डबेवाला सध्या रोजगार कमी झाल्यामुळे मोठय़ा संकटात आला आहे. 50 वर्षीय अशोक कुंभार हे अंधेरी पूर्व येथे आपल्या चार जणांच्या कुटुंबासोबत राहतात. गेल्या 30 वर्षांपासून ते मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतात. त्याची पत्नी गृहिणी असून दोन मुले कॉलेजमध्ये शिकतात. कोरोनाच्या आधी त्यांना डबे पोहोचवण्याच्या कामातून 20-25 हजार रुपये महिन्याला मिळायचे. त्यातून ते आपले घर चालवायचे, पण कोरोनानंतर त्यांची कमाई आता 12-15 हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे घर चालवणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.  हीच परिस्थिती इतर डबेवाल्यांची आहे. 

डबे कमी झाले 

 कोरोनापूर्वी  डबेवाले दररोज मुंबईत दोन लाख डबे  पोहोचवत होते, मात्र सध्या त्याचे प्रमाण 40 ते 50 हजारापर्यंत खाली आले आहे. डबे कमी झाल्याने डबेवाल्यांना मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे.  

दोन पैसे जादा मिळावे म्हणून पर्यायी काम 

विश्वनाथ दिंडोरे हे 32 वर्षीय तरुण डबेवाला गेल्या बारा वर्षांपासून डबा पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र सध्या कमी उत्पन्न मिळत असल्याने ते आता वेळेनुसार लोडरचेही काम करतात. डब्बे वाले मेहनत जास्त करत आहेत, पण त्यातून कमी पैसे मिळत असल्याने त्यांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे. त्यामुळे अनेकांनी गावची वाट धरली आहे, तर काहींनी दोन पैसे जादा मिळावे म्हणून पर्यायी दुसरे काम करणे पसंत केले आहे. दरम्यान आपला डबे पोहोचवण्याचा व्यवसाय आणि परंपरा कायम ठेवण्यासाठी डबेवाल्यांची संघटना आणि ट्रस्ट प्रयत्न करत आहे.