इंडिया आघाडीची एकजूट आणि प्रचंड शक्ती प्रदर्शन करत खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज सादर

हातात मशाल… भगवा जल्लोष… विनायक राऊत तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा जोरदार घोषणा… शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्र‌वादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची एकजूट… असे जोरदार शक्ती प्रदर्शन करत इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईन असा खणखणीत आत्मविश्वास उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी मराठा सभागृहामध्ये इंडिया आघाडीचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्याला इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते आमदार राजन साळवी, लक्ष्मण वडले, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, राजेंद्र महाडीक, अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, विवेक ताम्हणकर, माजी मंत्री रवींद्र माने, प्रवीण भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, सुभाष बने, महिला संघटक नेहा माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वाधिक मताधिक्य राजापूरातून देणार… मताधिक्यासाठी जणू स्पर्धाच
इंडिया आघाडीच्या मराठा सभागृहातील मेळाव्याला विराट गर्दी झाली होती. सभागृह खचाखच भरले होते. शिवसैनिकांसह इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वहात होता. यावेळी उपनेते आमदार राजन साळवी आणि माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी लोकसभा मतदार संघामध्ये खासदार विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच आहेत. पण ते राजापूर विधानसभा मतदार संघातून असेल असे ठणकावून सांगितले. त्यानंतर शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी टायगर अभी जिंदा है असे म्हणून चिपळूणातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची घोषणा केली.

किरण सामंत दिवसाचे की रात्रीचे – वरुण सरदेसाई
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार विनायक राऊत हे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील. त्यांच्या मतदार संघातील अडीच हजार गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क अफाट आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्यासमोर अद्यापही उमेदवार उभा करता आलेला नाही. आम्ही रोज बातम्या पहातो. रोज एकेकाचे नाव पुढे येते. राणेंचं नाव येतं पण कोणते राणे? छोटे राणे की त्यापेक्षा छोटे राणे? किरण सामंतांचे नाव येतं पण कोणते किरण सामंत? सकाळचे किरण सामंत की रात्रीचे किरण सामंत? अशा मार्मिक शब्दात वरुण सरदेसाई यांनी शालजोडे हाणले.

107 खळा बैठका घेतल्या… महिन्यातले 20 दिवस मतदार संघात… दिवसातून 14 तास काम…

इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले की, गेल्या दहा वर्षात मी कोकणचे सुसंस्कृत विचार टिकवण्याचे काम केले. यंदा लोकसभा मतदार संघात प्रचार करत असताना आतापर्यंत 107 खळा बैठका घेतल्या. महिन्यातील 20 दिवस मी मतदार संघात असतो. दिवसातून 14 तास मी काम करतो. या मतदार संघातील विकास कामे करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्य घेऊन मी विजयी होईन असा आत्मविश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. 2014 पूर्वी हा मतदार संघ गडचिरोलीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा असुरक्षित मतदार संघ होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा संवेदनशील मतदार संघ होता. आता या मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. आधीच्या राज्यकर्त्यांनी मतदार संघात दहशत निर्माण केली होती. ती दहशत आता संपली आहे. इल्लू, टिल्लू आणि हे यांच्यामुळेच हा मतदार संघ असुरक्षित झाला होता अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली.

राज्यघटना संपुष्टात आणायला निघालेत त्यांना तडीपार करा – भास्कर जाधव
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, भाजपचेच खासदार म्हणाले होते की भाजपचे चारशे खासदार आले तर आम्ही घटना बदलू. त्यामुळे सावध रहा. घटना वाचवायची असेल तर भाजपला तडीपार करा. यांना घटना संपुष्टात आणायची आहे आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरु केले असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. ते पुढे म्हणाले की, पद्मश्री मिळालेले काही लोक म्हणतात की, 2014ला स्वातंत्र्य मिळाले. विक्रम गोखले म्हणून गेले, कंगना म्हणाली आणि हेच भाजपवाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. म्हणजे किती फसवेगिरी आहे ते बघा. ज्यांनी आयुष्याची आणि कुटूंबाची राखरांगोळी करताना आपल्या पुढच्या पिढीला तरी स्वातंत्र्य मिळेल याकरीता प्राणांचे बलिदान दिले. पण आता हेच लोक त्या क्रांतीकारकांचा अपमान करत आहेत. स्वातंत्र्य नाकारत असल्याची टीका केली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा मला विश्वास आहे. आणि विरोधकांमध्येही तशी धडकी भरली आहे. खासदार विनायक राऊत यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तिवरे धरण फुटले तेव्हा लोकांच्या मदतीला खासदार विनायक राऊत होते. चिपळूणात महापूर आला तेव्हा लोकांच्या मदतीला खासदार विनायक राऊत होते. तेव्हा विनायक राऊत यांनी काय केले असे विचारणारे कुठे होते असा सवालही शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.