हिंदुस्थानने उडविला चीनचा धुव्वा

तीन वेळच्या विजेत्या यजमान हिंदुस्थानने चीनचा 7-2 गोलफरकाने धुव्वा उडवत आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील आपल्या अभियानाचा धडाकेबाज प्रारंभ केला.

हरमनप्रीत सिंगने पाचव्या आणि आठव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत हिंदुस्थानला झकास सुरुवात करून दिली. त्यानंतर सुखजित सिंगनेही पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत पहिल्या क्वार्टरमध्येच आकाशदीप सिंगने 16 व्या मिनिटाला मैदानी गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 4-0 अशी आणखी वाढविली. अखेर ई वेनहुईने 18 व्या मिनिटाला गोल करून चीनचे खाते उघडले, मात्र पुढच्याच मिनिटाला वरुण कुमारने पेनल्टी कॉर्नरवर हिंदुस्थानसाठी पाचवा गोल ठोकला. जिओ जिशेंगने 25 व्या मिनिटाला गोल करून चीनसाठी 2-5 असे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र वरुण कुमारने पुन्हा मिळालेल्या पेनल्टीचे सोने करताना हिंदुस्थानला 6-2 असे मोठय़ा आघाडीवर नेले. मनदीप सिंगने 40 व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 7-2 अशी भक्कम केल्याने चीनवरील दडपण वाढत गेले. चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही, पण हिंदुस्थानने चीनवर दणदणीत विजय मिळविला.

मलेशिया, कोरियाची विजयी सलामी

पहिल्या लढतीत मलेशियाने पाकिस्तानचा 3-1 गोलफरकाने पराभव करीत आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. आणखी एका लढतीत दक्षिण कोरियाने जपानचा 2-1 गोलफरकाने पराभव केला