हिंदुस्थानी सैन्याकडून अग्नि प्राईम क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण

हिंदुस्थानी सैन्य आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि प्राईमचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. सैन्याच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या क्षेपणास्त्राच्या मदतीने अण्वस्त्रांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं सोपं होणार आहे. या मिसाईलचं परिक्षण ओडिशाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आलं आहे.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि प्राईम हे संपूर्णतः देशी बनावटीचे असून इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल प्रोग्रामच्या अंतर्गत ते विकसित करण्यात आलं आहे. परीक्षणादरम्यान हे क्षेपणास्त्र सगळ्या पातळ्यांवर खरं उतरलं आहे. क्षेपणास्त्र परीक्षणावेळी त्यावर अनेक सेन्सर्स लावण्यात आले होते. त्यामुळे मिसाईलचा डेटा गोळा केला जाऊ शकेल.

बॅलेस्टिक मिसाईल अग्नि प्राईमच्या परीक्षणाच्या दरम्यान, सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्यासह स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचे प्रमुख आणि डीआरडीओचे अनेक अधिकारी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या परीक्षणासाठी संबंधित संस्थांचं अभिनंदन केलं आहे. या क्षेपणास्त्राच्या सहभागानंतर सैन्याला आणखी मजबुती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.