आज चांद्रयान झेपावणार, इस्रोचे शास्त्रज्ञ तिरुपती देवळात

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या (दि. 14) दुपारी ठीक 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 अवकाशात झेपावणार आहे. दरम्यान, ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिरूपती बालाजी येथे दर्शन घेतले. तसेच चांद्रयान-3 ची छोटी प्रतिकृती बालाजी चरणी अर्पण करण्यात आली.

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने ही महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. 615 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या चांद्रयान-3 मोहमेचे मुख्य उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करणे हे आहे.

24 ऑगस्टपर्यंत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग
उद्या दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 अवकाशात झेपावेल. सुरूवातीला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात करेल. काही काळानंतर पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि चंद्राच्या कक्षेत पोहचेल.

चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्या जातील. 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चंद्रावर अलगद उतरेल. त्यानंतर लँडरमधून रोव्हर चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाईल.
…तर हिंदुस्थान चौथा देश ठरेल

इस्त्रोची चंद्रावर स्वारी ही महत्वकांक्षी मोहीम आहे. हिंदुस्थानबरोबर जगाचे लक्ष चांद्रयान-3 कडे असणार आहे. कारण 2019 मध्ये चांद्रयान-2 ही मोहीम अयशस्वी झाली होती. त्यावेळी चंद्रावर उतरताना लँडर चंद्राच्या जमिनीवर आदळून तुकडे झाले होते.

चांद्रयान-3 मोहमेतील लँडर अलगद चंद्रावर उतरले तर मोहीम फत्ते होईल. ही मोहीम यशस्वी करणारा हिंदुस्थान हा जगातील चौथा देश ठरेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने ही मोहीम पूर्ण केली आहे.

श्री बालाजी चरणी प्रतिकृती अर्पण
ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमने आज तिरूपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी चांद्रयान-3 ची प्रतिकृती श्री बालाजी चरणी अर्पण करण्यात आली.