हिंदुस्थानची लोकसंख्या 144 कोटी

हिंदुस्थानची लोकसंख्या तब्बल 144 कोटींहून अधिक झाल्याचा दावा युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’च्या अहवालात करण्यात आला आहे. हिंदुस्थानने चीनलाही मागे टाकले आहे.

अहवालानुसार, 2006-2023 दरम्यान हिंदुस्थानात बालविवाह 23 टक्के कमी झाले आहेत. तसेच प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. 2006-2023 दरम्यान झालेल्या एकूण विवाहांपैकी 23 टक्के बालविवाह होते, ज्यामध्ये मुलगा आणि मुलीचे वय 21 आणि 18 वर्षांपेक्षा कमी होते.

या वर्षाच्या सुरुवातीला हिंदुस्थानने सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला मागे टाकले होते, ज्याची लोकसंख्या 142.5 कोटी आहे.  2011 मध्ये केलेल्या जनगणनेनुसार हिंदुस्थानची लोकसंख्या 121 कोटी असल्याची नोंद झाली होती. 77 वर्षांत हिंदुस्थानची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे.

लैंगिक आरोग्य उत्तम

यूएनएफपीएच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, हिंदुस्थानातील लैंगिक आणि प्रजनन आरोग्य 30 वर्षांतील सर्वोत्तम पातळीवर आहे. त्यामुळे प्रसूतीदरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे. जगातील अशा मृत्यूंमध्ये हिंदुस्थानचा वाटा 8 टक्के आहे.

शारीरिक संबंधांच्या निर्णयांमध्ये पुरुषांचे वर्चस्व  

या अहवालात जागतिक स्तरावर महिलांच्या लैंगिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून लाखो महिला आणि मुली अजूनही आरोग्याच्या महत्त्वाच्या उपाययोजनांपासून वंचित असल्याचे म्हटले आहे. जगभरात 2016 पासून दररोज 800 स्त्रिया बाळाला जन्म देताना मरण पावतात. आजही एक चतुर्थांश महिला आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध करण्यास नकार देऊ शकत नाहीत. लैंगिक संबंध ठेवणाऱ्या दहापैकी एक महिला गर्भनिरोधक पद्धतींबद्दल स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही. अहवालात असेही म्हटलेय की, 40 टक्के देशांमध्ये शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेण्यात महिला पुरुषांपेक्षा मागे आहेत.

24 टक्के लोकसंख्या 0-14 वयोगटातील

2006-2023 दरम्यान झालेल्या एकूण विवाहांपैकी 23 टक्के बालविवाह होते. ज्यामध्ये मुलगा आणि मुलीचे वय 21 आणि 18 वर्षांपेक्षा कमी होते. अहवालानुसार, हिंदुस्थानच्या एकूण लोकसंख्येपैकी 24 टक्के लोकसंख्या 0-14 वर्षे वयोगटाची आहे, तर 15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. देशातील पुरुषांचे सरासरी वय 71 वर्षे आहे, तर महिलांचे सरासरी वय 74 वर्षे आहे.