क्लीन-अप मार्शल निविदेतील घोटाळय़ाची चौकशी करा; जुन्याच टेंडरने नव्याने काम

मुंबईत नुकतेच नेमण्यात आलेल्या क्लीन-अप मार्शलच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक, उपविभागप्रमुख संजय पवार यांनी पालिका आयुक्त प्रशासक यांना निवेदन देत घोटाळय़ाच्या चौकशीची मागणी केली आहे. हे कंत्राट देताना नव्याने टेंडर काढणे अनिवार्य असताना 2020 मध्ये निविदा भरलेल्या कंपन्यांनाच काम दिल्याचा आरोपही संजय पवार यांनी केला आहे.

मुंबईत कोरोनानंतर दोन वर्षांनी नुकतीच क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. ए फोर्ट, सी मुंबई, ई वॉर्ड भायखळा, जी/एस वरळी, आ/सी बोरिवली, के/ई अंधेरी पूर्व या सहा वॉर्डांमध्ये   क्लीन-अप मार्शलचे कामही सुरू झाले असून टप्प्याटप्प्याने सर्व 25 वॉर्डमध्ये हे काम सुरू होणार आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून कारवाई केली जाणार असून 200 ते एक हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. यासाठी 25 विभागांचे काम 13 कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र 54 पंपन्यांनी टेंडर भरले असताना केवळ 13 कंपन्या का निवडल्या, असा सवालही संजय पवार यांनी केला आहे. कंपन्यांना नियमानुसार 5 लाख डिपॉझिट 2 लाख करण्यात आले असून अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी आणि याबाबत चर्चेसाठी प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणीही पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे.