अब दिल्ली दूर नहीं; चेन्नईपाठोपाठ कोलकात्यालाही रोखण्यासाठी दिल्ली सज्ज

सलग दोन विजय नोंदविणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची झळ देण्यासाठी सज्ज झाली आहे. ऋषभ पंतच्या दमदार पुनरागमनामुळे दिल्लीत चैतन्य संचारले असून कोलकात्याविरुद्धही जोरदार आणि आक्रमक खेळ पाहायला मिळणार एवढे निश्चित. त्यामुळे दिल्लीपासून आता विजय फार दूर नाही, याची जाणीव सर्व संघांना झाली आहे.

चेन्नईने सलग दोन विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. दुसरीकडे सलग दोन पराभवांमुळे दिल्ली खूप मागे होती. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्लीची फलंदाजी पूर्ण अपयशी ठरली होती. त्यामुळे पंजाबने सहज विजय नोंदवत आपली घोडदौड सुरू केली. पहिल्या सामन्यातील अपयशाची मालिका जयपूरमध्येही कायम राहिली. राजस्थान रॉयल्सचे 185 धावांचे आव्हान दिल्ली कॅपिटल्सला पेलवले नव्हते. ट्रिस्टन स्टब्सने संघाच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. या सामन्यातही कर्णधार ऋषभ पंतला सूर गवसला नव्हता.

चेन्नईची विजयाची हॅटट्रिक दिल्लीनेच मोडली होती. आता कोलकाताही विजयाच्या हॅटट्रिकसाठी सरसावला आहे. कोलकात्याने दोन्ही सामन्यांत विजय मिळवले असले तरी यात फलंदाजांचा वाटा मोलाचा आहे. हैदराबादला त्यांनी अवघ्या 4 धावांनी नमवले होते तर वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यरच्या जोरदार फलंदाजीमुळे बंगळुरूचाही सहज पराभव केला होता. त्यामुळे लयात असलेल्या कोलकात्याला विजयाची हॅटट्रिक साजरी करणे फार कठीण नाही. फिल सॉल्ट, सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर आणि आंद्रे रसलच्या ताकदीमुळे कोलकात्याचीही ताकद वाढली आहे.