संशय खरा ठरला, अखेर चहल मिंध्यांच्या ‘हुजूर’पागेत

शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा संशय खरा ठरला. निवडणूक आयोगाने मुंबई पालिकेच्या आयुक्त पदावरून हटवल्यानंतर इक्बालसिंह चहल थेट मिंध्यांच्या ‘हुजूर’पागेत दाखल झाले आहेत. हजारो कोटींच्या भ्रष्टाचारासाठी मिंधे सरकारला मुंबई महानगरपालिकेची तिजोरी मोकळी करणारे चहल यांचे मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) पुनर्वसन करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेले पी. वेलारासू यांनाही सामाजिक न्याय विभागात सचिव पदाची खुर्ची देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक असताना इक्बालसिंह चहल यांनी मिंधे  सरकारच्या आदेशाने हजारो कोटींचे घोटाळे केले होते. रस्ते काँक्रिटीकरण, स्ट्रीट फर्निचर खरेदी, मुंबईचे सौंदर्यीकरण आदी अनेक माध्यमांतून चहल यांनी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या खर्चांना मंजुरी दिली होती. या कामांची कंत्राटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मर्जीतील कंत्राटदारांना दिली गेल्याचेही आरोप झाले होते.

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिकेतील या घोटाळय़ांचा पर्दाफाश केला होता. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी कागदोपत्री पुरावेच मांडले होते. चहल यांनाही त्यांनी पत्र पाठवून याबाबत जाब विचारला होता. मात्र चहल यांनी आदित्य ठाकरे यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर देण्याचे धाडस दाखवले नव्हते.

मिंधे सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी चहल व महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांची पाठराखण केली होती. आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही चहल यांना त्या पदावर सरकारने कायम ठेवले होते. पेंद्रीय निवडणूक आयोगाने चहल व अन्य अधिकाऱ्यांची तातडीने बदली केली जावी असे आदेश सरकारला देऊनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. उलट सरकारने निवडणूक आयोगाला पत्र लिहून चहल व अन्य सनदी अधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची जबाबदारी असल्याचे सांगत मर्जीतील अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

मिंधे सरकार निर्देशांचे पालन करत नसल्याने अखेर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत चहल व अन्य अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच पदावरून हटवले होते. त्यानंतर त्यांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज चहल यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश मिंधे सरकारने जारी केले. मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची काल नियुक्ती केली. त्यानंतर चहल यांची त्यांच्या रिक्त जागेवर आज बदली करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून मुंबई लुटणारे चहल आता सीएमओच्या माध्यमातून ती जबाबदारी पार पाडतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई लुटण्यासाठीच सीएमओत पुनर्वसन, आदित्य ठाकरे यांचा हल्ला

मिंधे सरकार आणि इक्बालसिंह चहल यांचा सिंडिकेट घोटाळा चव्हाटय़ावर आणणारे शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी या नियुक्तीवर टीका केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘दोन दिवसांपूर्वी आपण भाकीत केले होते अगदी तसेच आज घडले. मुंबई महानगरपालिकेचे भ्रष्ट आयुक्त चहल यांची सीएमओवर नियुक्ती करण्यात आली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना म्हणजेच सीएमना (कॉण्ट्रक्टर मिनिस्टर) मदत करण्यासाठीच या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झाली आहे’, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेले हे बक्षीस आहे’, असेही त्यांनी नमूद केले आहे.