तिसऱ्या महायुद्धाचा धोका? इराणचा इस्रायलवर हल्ला; जहाजाचं अपहरण, 17 हिंदुस्थानी अडकले

इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आता इराण आणि लेबनानने उडी घेतली आहे. शनिवारी मध्यरात्री इराण आणि लेबनानने इस्त्रायलवर हल्ला केला. इराणने जवळपास 200हून अधिक मिसाईल आणि ड्रोनद्वारे, तर लेबनानने 40हून अधिक रॉकेटद्वारे इस्रायलवर हल्ला केला आहे. यात बॅलेस्टिक मिसाईलसह क्रूझ मिसाईलचाही समावेश आहे. या हल्ल्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे.

इराण आणि लेबनानच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. जेरुसलेमसह इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचा आवाज घोंगावत असून सैन्याने एअर डिफेन्स सिस्टीमही अॅक्टिव्हेट केली आहे. इराण आणि लेबनानने डागलेली अनेक मिसाईल आणि रॉकेट अमेरिका व इस्रायलने हवेतच नष्ट केली आहेत. काही मिसाईल इस्रायलच्या सैन्य अड्ड्यांवर पडली असून यात थोडफार नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्यांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, इराणच्या हल्ल्यामध्ये इस्रायलच्या दक्षिण भागातील सैन्यतळाचे थोडे नुकसान झाले आहे. मात्र इस्रायलच्या एरो एरियल डिफेन्स सिस्टीमने अल अक्साच्या गोल्डन डोमच्या आकाशातच इराणची मिसाईल आणि रॉकेट नष्ट केल्याने मोठे नुकसान टळले.

इराण-इस्रायलला जाणे टाळा

इराणने इस्रायलशी संबंधित एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला आहे. हे जहाज संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) हिंदुस्थानकडे निघाले होते. MSC ARIES असे जहाजाचे नाव असून यावर 17 हिंदुस्थानी नागरिक अडकले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानचेही टेन्शन वाढले आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये सद्यस्थितीवर चर्चा झाली. इस्रायलच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच ब्रिटनसह जगभरातील देशांनी या हल्ल्याची निंदा केली असून संयुक्त राष्ट्रानेही आपातकालीन बैठक बोलावली आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेली धमकी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनेई यांनी काही दिवसांपूर्वीच इस्रायलवर हल्ल्याची धमकी दिली होती. इस्रायल आणि हमासच्या युद्धात हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. याची शिक्षा इस्रायलला मिळेल. इस्रायलच्या दृष्ट सरकारला शिक्षा केली जाईल, अशी धमकी खोमेनेई यांनी दिली होती.