स्वामी विवेकानंदांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य; इस्कॉनकडून संन्यासी अमोघ लिला दास यांच्यावर 1 महिन्याची बंदी

monk Amogh Lila Das

 

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शिअसनेस (इस्कॉन) ने मंगळवारी त्यांचे एक संन्यासी अमोघ लिला दास यांच्यावर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यावर अनुचित वक्तव्य केल्याबद्दल बंदी घातली आहे.

अमोघ लिला दास एक आध्यात्मिक प्रेरक वक्ता आहेत ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या एका ‘लेक्चर’ दरम्यान, अमोघ लिला दास यांनी स्वामी विवेकानंदांच्या माशांच्या सेवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले की, सद्गुणी मनुष्य प्राण्याला इजा पोहोचवणारी कोणतीही गोष्ट कधीही खाणार नाही.

‘सद्गुणी मनुष्य कधी मासे खाईल का? माशालाही वेदना होतात ना? मग पुण्यवान माणूस मासे खाईल का?’ असं अमोघ लिला दास यांनी जनसमुदायाला संबोधित करताना सांगितलं. त्यांनी स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यावरही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आणि इस्कॉनला त्यांच्या संन्यासांविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडले.

आपल्या निवेदनात, इस्कॉननं म्हटले आहे की अमोघ लिला दास यांच्या अयोग्य आणि अस्वीकार्य वक्तव्यांमुळे आणि या दोन व्यक्तिमत्त्वांच्या महान शिकवणींबद्दल त्यांची समज नसल्यामुळे अनेकजण दुखावले गेले आहे. त्यासोबतच त्यांच्यावर एक महिन्याच्या कालावधीसाठी बंदी घातली जाईल.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की अमोघ लिला दास यांनी त्यांच्या वक्तव्याप्रकरणी क्षमा मागितली होती आणि गोवर्धनच्या डोंगरावर एक महिना ‘प्रायश्चित’ करण्याचे व्रत घेतले आहे. ते तात्काळ सार्वजनिक जीवनापासून स्वत:ला पूर्णपणे वेगळे करतील असंही त्यात म्हटलं आहे.