इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम, आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार धडाम; विक्रीचा सपाटा

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईमध्ये (Israel-Palestine War) सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम हिंदुस्थानी शेअर बाजारावर (Share Market News) दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळत आहे. शेअर बाजारात लाल निशाणा फडकल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली.

सोमवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह उघडले. विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने लाल झेंडा फडकला आणि सेन्सेक्समध्ये 500, तर निफ्टीमध्ये 150हून अधिक अंकांची घसरण झाली. बॅक निफ्टीतही तब्बल 540 अंकांची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

तेल तापले

दरम्यान, इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम तेलाच्या किंमतीवरही झाला आहे. अर्थात इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन तेलाचे मोठे उत्पादक नाही, मात्र हमासच्या पाठी खंबीर उभा असणारा इराण मात्र तेलाचा मोठा उत्पादक देश आहे. या युद्धामध्ये इराणने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती तब्बल 5 टक्के वाढल्या असून एका बॅरलसाठी आता 87 डॉलर मोजावे लागणार आहेत.

डीमॅट अकाऊंटचा आकडा 12.97 कोटींपार

कोविडनंतर देशातील बहुतांश नागरिक गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराकडे वळली आहे. याचा परिणाम डीमॅट अकाऊंटच्या वाढीवर झाला आहे. सप्टेंबरमध्येही जवळपास 30 लाख लोकांनी डीमॅट अकाऊंट घेतले आहे. त्यामुळे डीमॅट अकाऊंटचा आकडा 12.97 कोटींच्या पार गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 26 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.