दोन मुलं आणि बापासह पाच जणांना अटक, सेन्सॉर कीटच्या माध्यमातून गाड्यांची चोरी

फोर व्हिलर गाड्या चोरणारे अख्खं कुटुंब जालना स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक स्वीफ्ट डिझायर कार चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्याचा तपास करण्याच्या अनुशंगाने खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील चोरांनी चोरली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथकाची नेमणूक करून बुलडाणा जिल्ह्यातील धाड करडी याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता चोरी गेलेली कार त्याठिकाणी आढळून आली. त्यानंतर अख्खं कुटुंबच एका सेन्सॉर कीटच्या साहायाने गाडी चोरी करत असल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आल्याने पोलीसांचे पथकही थक्क झाले.

जालना शहरातील फिर्यादी पंजाबराव शेषराव पवार रा.वंश ब्ल्युबेल्स सोसायटी ‘जालना यांची घरासमोर उभी असलेली स्विफ्ट कार 10 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दाखल करण्यात आला होता. या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना गुन्हा उघडकीस आणण्याचे सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांनी या गुन्ह्या संदर्भात एक पथक तयार केले. त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या. 11 ऑगस्ट रोजी पथक गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करीत होते. त्याच वेळी गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील धाड करडी ह.मु. गुलशनगर चिखली येथील 22 वर्षीय शेख अफजल शेख दाऊद याने त्याच्या साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चिखली येथे जावुन शेख अफजल शेख दाऊद, शेख फरदीन शेख युसुफ (19)रा. संजयनगर देऊळगाव राजा, जि. बुलडाणा, शेख दाऊद ऊर्फ बब्बु शेख मंजुर (56), शेख राजा शेख दाऊद (24), अरबाज शेख दाऊद (18) सर्व रा. धाड करडी ता. बुलडाणा जि. बुलडाणा ह.मु. गुलशननगर चिखली जि. बुलडाणा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेली स्वीफ्ट डिझायर व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही-300 चारचाकी गाडी व बनावट चावी तयार करण्यासाठी ऑनलाईन मागविलेले डिव्हाईस कीट, बनावट चाव्या,स्क्रू ड्रायव्हर असे एकुण 9 लाख 79 हजार 300 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आला आहे. आरोपी शेख दाऊद हा अभिलेखावरील कुख्यात चारचाकी वाहन चोर असून त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुलगा शेख नदीम हा सुध्दा चारचाकी वाहने चोरी करतो. सध्या तो बीड जिल्ह्यात अटक असुन त्याच्या जामिनासाठी पैसे जमा करण्यासाठी आरोपी यांनी डिव्हाईसच्या मदतीने बनावट चावी तयार करुन गुन्हृयातील कार चोरीचा गुन्हा केलेला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, भाऊराव गायके, राम पव्हरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, राम पव्हरे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, रमेश राठोड, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सतीष श्रीवास देवीदास भोजणे, किशोर पुंगळे, रवी जाधव, भागवत खरात, योगेश सहाने, सचीन राऊत, कैलास चेके, चालक प्रपोउपनि संजय राऊत, सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.