अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट

बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा या अभिनयासह राजकारणात देखील सक्रिय आहेत. अभिनयाप्रमाणे राजकारणातही त्यांनी चमक दाखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. मात्र जयाप्रदा या हल्ली अडचणीत सापडल्या असून दिवसेंदिवस त्यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. आचार संहितेच्या उल्लंघनाप्रकरणी जयाप्रदा यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जयाप्रदा यांच्या विरोधातील हे सातवे अजामीनपत्र वॉरंट आहे.

जयाप्रदा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानचे आहे. त्यांच्याविरोधात स्वार आणि केमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात अनेकदा आदेश देऊनही प्रदा न्यायालयात उपस्थित राहिल्या नाही. या प्रकरणाची 25 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून यासाठी जयाप्रदा यांच्याविरोधात पुन्हा एकदा वॉरंट काढण्यात आलं आङे.

उत्तर प्रदेशातील रामपुरात भाजपने जयाप्रदा यांना 2019 साली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. याच दरम्यान जयाप्रदा यांच्या विरोधात आचार संहितेचे उल्लघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी आचार संहिता लागू असतानाही नूरपूर या गावात रस्त्याचे जयाप्रदा यांनी उद्घाटन केलं होतं. तसेच केमरी भागातील एका गावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणाची सुनावनी एमपी-एमएलए न्यायालयात सुरू आहे.