दीपशिखा – कृष्णमय मीरा

>>जयश्री संगीतराव

सोळाव्या शतकातील संत परिवारातील एक असं पर्व, एक अशी व्यक्तिरेखा जिने आपले संपूर्ण आयुष्य कृष्णार्पण  केले. बालपणापासूनच ती कृष्णमय झाली होती. जोधपूरचा राजा रतनसिंग राठोडची एकुलती एक कन्या, कृष्णाशी तिने जोडलेलं नातं म्हणजे अलौकिक, आत्मिक प्रेम, नि:स्वार्थ भक्ती, समर्पण, तन्मयता, तादात्म्य  हे सगळे भाव तिने अर्पण केले ते कृष्णाच्या पायाशी. तिची भक्ती, कृष्णाशी तिचं असलेलं नातं हे वासना, आस, निकटता यांच्याही पलीकडचं होतं. ओढ होती ती भक्तीची आणि भक्तीमध्ये तादात्म्याची. तिने कृष्णाला ना काही मागितलं, ना काही अपेक्षा केली.  तिने लिहिलेली भजनं आणि पदं यात भक्तिरस दिसतोच, पण त्यातील शब्द हृदयापासून निघून कृष्णाच्या हृदयी पोहोचवण्याचं सामर्थ्य या शब्दातून दिसून येतं.

एरि मैं तो दर्द दिवानी मेरा दर्द ना जाने कोय…’ 

मीरा, कृष्णवेडी मीरा. लहानपणापासूनच ज्याचा ध्यास घेतला त्या सावळ्याची मीरा. जन्मली राजवंशात. राजस्थानमधील मेडता संस्थानचे राजे रतनसिंग आणि वीर कुमारीची लाडकी लेक. भातुकलीत रमणारी. बाहुला-बाहुलीचे लग्न लावणारी. बाहुलीचा नवरा बाहुला तर माझा नवरा कोण? हा बालवयात मला पडलेला सहजसुलभ प्रश्न आणि शेजारच्या लग्नातले नवरानवरी बघून तर हा प्रश्न आणखीनच माझ्या डोक्यात गोंधळ घालू लागला. तेव्हा उत्तरादाखल कोनाडय़ात असलेल्या तुझ्या मूर्तीकडे बोट दाखवत ‘कन्हैया’ असे म्हणून आईने तुला माझ्यासमोर उभे केले. तेव्हापासूनच मी तुला पतीच काय, माझं सर्वस्व मानलं. बालपणाचा काळ बघता बघता सरला. जनरीतीप्रमाणे लग्नवेदीवर उभं राहण्याची वेळ आली. मेवाडचे संस्थानिक भोज राजाची निवड माझे पती म्हणून केली गेली, पण मन स्वस्थ बसू देत नव्हतं. कारण हे भगवंता, मी तर तुलाच माझं सर्वस्व  मानलं होतं. माझा पतीही मानलं होतं. मग मी दुसऱयाशी एकरूप कशी बरं होऊ शकेन? लौकिक अर्थाने मी पत्नी तर झाले, पण पतीमध्ये मनाने रममाण मात्र नाही होऊ शकले. एखाद्या सुनेने सतत कोणाचा तरी ध्यास घ्यावा, सासरी येताना कृष्णाची मूर्ती आणावी अन् अहोरात्र त्यातच गुंतून राहावं. सांसारिक गोष्टींत रस नसावा हे कुठल्या सासरला सहन होणार? मलाही विरोध झालाच. कलंकिनी ठरवलं गेलं. भौतिक सुख नाकारणारी पत्नी कुठल्या पतीला आवडणार? सदैव कृष्णाचं गुणगान करणारी पत्नी म्हणून सामाजिक दृष्टय़ा माझ्या पतीला लाजिरवाणं वाटू लागलं. विरहिणीसारख्या जगणाऱया मला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी मला विषाचा प्यालाही दिला गेला. भगवंता,  तोही मी तुझ्यासाठी ओठाला लावला. आपल्या भक्तासाठी धावणारा तू, त्या विषाचे अमृत करून गेलास.

विष का प्याला 

राणाजीने भेजा  

पिवत मीरा हाँसी रे 

           पग घुंगरू बांध             

मीरा नाची रे 

आत्म्याचं परमात्म्याशी झालेलं मीलन म्हणजे मीरा-कृष्ण! मारण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही मीरेला संपवता आलं नाही याचं सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं. माझी कृष्णभक्ती माझ्या पतीने समजून घेण्याचा उशिरा का होईना, प्रयत्न केला.

माझी अवस्था खूप विचित्र झाली. गिरिधर, मला तुझ्याशिवाय काही सुचत नव्हतं. रविदास यांनी मला मार्ग दाखवला.

‘मेरे तो गिरिधर गोपाल,  दुसरा न कोय’ म्हणणाऱया माझ्या हृदयानं वृंदावनाची वाट धरली. माझे पती मला परत न्यायला आले, पण त्यांचा अधिकार केवळ माझ्या शरीरावर होता, मनावर नाही. माझं मन तुझ्यात गुंतलं हे त्यांनाही कळलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर तर परिवारात माझी अडचणच होऊ लागली. माझ्यामुळे घरच्यांना अपमानास्पद वाटू लागलं. मला कलंकिनी ठरवण्यात आलं, पण गिरिधरा, मला आज कशाचीही पर्वा नाही. मला दुसरे कोणी दिसतच नाही. कशाची इच्छाही उरली नाही. माझं मन कोणातही कधी गुंतलंच नाही. बघ, तुझ्या अस्तित्वाने भारावलेल्या वृंदावनात कसा आनंद भरला आहे! सगळीकडे फक्त तू आणि तूच आहेस. तू मला बोलावत आहेस. थांब, मी आले कन्हैया…

पायोजी मैने राम रतन धन पायो  

जन्म जनम पुंजी पायी  

जगमे सभी खुमायो 

पायोजी मैने राम रतन धन पायो 

माझं मन फक्त तुझ्यात गुंतलं. तुझ्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही. माझी वाणी, माझी कल्पना फक्त आणि फक्त तुझं गुणगान करण्यातच मग्न झाली. माझ्या एकेका भजनात तू सामावलेला आहेस गिरिधरा. आता माझी शेवटी एकच इच्छा आहे की, तुझ्यात रममाण असताना माझा आत्मा तुझ्यापर्यंत पोहोचावा आणि या आत्म्याचं परमात्म्याशी मीलन व्हावं. कन्हैया, तू माझं ऐकलंस. तुझ्याच पायाशी असताना या देहातून माझे प्राण तुझ्या हृदयात सामावण्यासाठी निघून गेले. जन्मोजन्मी तू मला असाच हृदयाशी ठेव हीच या मीरेची तुझ्या ठायी निष्ठा आणि मागणे. दुसरे मला काहीही नको.

मेरे तो गिरीधर गोपाल, दुजा न कोय…

[email protected]