Jharkhand : प्रवाशांनी भरलेली भरधाव बस पुलावरून थेट 50 फूट नदीत कोसळली, 4 जणांचा मृत्यू

झारखंडमधील गिरिडीहमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रांचीहून गिरिडीहकडे येणाऱ्या एका बसचे नियंत्रण सुटल्याने बस अचानक नदीत पडली. माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि नदीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

बस नदीत पडल्यानंतर तीन तास पथकाकडून बचावकार्य सुरू होते. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. 4 मृतांपैकी एकाची अद्याप ओळख पटलेली नाही. बसचा चालक अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड सरकारच्या मंत्री बेबी देवी यांनी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत प्रकृती जाणून घेतली. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अपघात कसा झाला?

बस नदीत कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. बसमधील अपघातानंतर अनेक प्रवासी अडकून पडले होते. काही लोक नदीत बुडाले मात्र त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त बस रांचीहून गिरिडीहच्या दिशेने जात होती. बस अचानक गिरिडीह-डुमरी रस्त्यावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. बस रेलिंग तोडून 50 फूट खाली नदीत पडली. अपघाताच्या वेळी बस अतिशय वेगात होती, असेही सांगितले जात आहे.