भाषण करायची वेळ आली की तुम्ही बाथरूममध्ये असायचात!

अजित पवार यांना हिंदी आणि इंग्रजी बोलता येत नाही, जेव्हा जेव्हा दिल्लीला भाषण करायची वेळ यायची तेव्हा अजित पवार बाथरूममध्ये असायचे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तुमच्या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या, त्या आम्हाला सांगाव्या लागतील असा इशाराही त्यांनी दिला. अजित पवार हे विरोधी पक्षनेते असताना ते करत असलेल्या भाषणांवरूनही आव्हाड यांनी टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला की अजित पवार हे सत्ताधाऱ्यांच्या टीपांवर वागणारा लीडर होते. भाषणं करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते असताना त्यांना त्यांचे खासगी सचिव भाषणे लिहून द्यायचे. त्या भाषणांतील सत्ताधारी पक्षावरील टीका अजित पवार वगळायचे असे आव्हाड यांनी म्हटले.

वयाने फरक पडत नसतो,पात्रता महत्त्वाची असते

दिग्गज टेनिस खेळाडू रोहन बोपण्णाने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावलं होते. 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून रोहन बोपण्णा यांचे अभिनंदन केले आहे. त्याच पोस्टमधून त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला होता.

हिंदुस्थानचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! रोहन बोपण्णा हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलंय. लक्षात असू द्या… खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो.पात्रता महत्त्वाची असते”, असा टोला आव्हाडांनी अजित पवारांना लगावला होता.