विमुक्ता – कायदा आणि देशशिस्तीची अजोड सांगड

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

पॉला-मे वीक्स या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सहाव्या अध्यक्षा. त्रिनिदाद हे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमधील एकमेव राष्ट्र आहे, ज्या राष्ट्रामध्ये एक महिला राष्ट्रप्रमुख झाल्या. वीक्स यांनी ज्या वेळी राज्यकारभार स्वीकारला, त्यावेळी देश कठीण परिस्थितीतून जात होता. देशात जिविताची हमी नव्हती, मृत्युदर वाढलेला होता. नरसंहारामध्ये महिला आणि मुलांचा बळी मोठय़ा प्रमाणात जात होता. तर बेरोजगारीही प्रचंड प्रमाणात वाढली होती. या काळात महिला आणि मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले.

पॉला-मे वीक्स या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सहाव्या अध्यक्षा होत्या. वीक्सच्या पदग्रहणानंतर त्रिनिदाद हे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमधील एकमेव राष्ट्र आहे, ज्या राष्ट्रामध्ये एक महिला राष्ट्रप्रमुख झाल्या. हिंदुस्थान आणि त्रिनिदादचे संबंध अतिशय जुने आहेत. अगदी 1845 मध्ये पहिले जहाज त्रिनिदादला गेले, तेव्हापासून हे नाते दृढ होत गेले आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते लेखक हिंदुस्थानी वंशाचे व्ही. एस. नायपोल स्थायिक झाले तो देश. या देशात हिंदुस्थानी वंशाचे अनेक लोक राहतात. हिंदुस्थानी लोक ज्या दिवशी या देशात आले तो दिवस स्वागत दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे विशेष.

खरं तर जानेवारी 2018 मध्ये नॅशनल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संसदीय विरोधी पक्षांची सहमती मिळवण्यासाठी पॉला-मे वीक्स यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले होते. पंतप्रधान कीथ रॉली यांच्या पीपल्स नॅशनल पार्टीच्या सरकारने वीक्स यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देऊ केली. पंतप्रधानांचा अंदाज अचूक ठरला. युनायटेड नॅशनल काँग्रेसची सहमती मिळाली आणि राष्ट्राध्यक्षपदावर पॉला-मे वीक्स यांच्या नावाचे शिक्कामोर्तब झाले. अर्थात सुरुवातीला निवडणूक होणार होती, परंतु निवडणुकीच्या दिवशी वीक्स या एकमेव नामनिर्देशित उमेदवार पात्र ठरल्या. त्यांचा अर्ज ग्राह्य मानण्यात आला आणि मार्च 2018 मध्ये पॉला-मे वीक्स यांनी कार्यभार स्वीकारला.

पॉला-मे वीक्स (जन्म 23 डिसेंबर 1958) यांचे शालेय शिक्षण बिशप हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर वेस्ट इंडीज विद्यापीठाच्या कायदा शाखेतून त्यांनी पदवी मिळवली. लंडन विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदव्युत्तर पदवी मिळवली. व्यावसायिक आणि नागरी कायद्यात त्यांचे विशेष नैपुण्य आहे. सर्वोच्च न्यायालयात अकरा वर्षांहून अधिक काळ त्यांनी न्यायाधीशाचे काम केले. त्यानंतर या पदाचा राजीनामा देऊन त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्या.

न्यायालयीन कारकीर्द अगदी बहरत असताना त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. त्यांनीच एका भाषणात सांगितल्याप्रमाणे देशाला गुन्हेगारीच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. त्यांनी 2018 ते मार्च 2023 या काळामध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या अध्यक्षा म्हणून देशात कायदा आणि देशशिस्तीची अजोड सांगड घालून दिली. या काळात त्यांना कठोर टीकेलाही सामोरे जावे लागले, पण सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. 1982 पासून अकरा वर्षे त्यांनी वकिली केली. त्यानंतर 1993 मध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला आणि खासगी वकिली सुरू केली. 1996 मध्ये त्यांची फौजदारी विभागात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. त्या पदावर काम करणाऱया त्या पहिल्याच महिला न्यायाधीश ठरल्या. पुढे अपील न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. 2012 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. तुर्क आणि कैकोसच्या न्यायपालिकेच्या क्षेत्रामध्ये सेवा देणारी त्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या.

वीक्स यांनी जवळ जवळ वीस वर्षे अँग्लिकन चर्चच्या कुलपती या सर्वोच्च पदी काम केले. त्याचप्रमाणे स्पेनमध्ये त्या रविवार-शाळेच्या अधीक्षकही होत्या. कॉमनवेल्थच्या न्याय प्रशिक्षण विभागांमध्येही प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. न्यायालयीन सल्लागार आणि प्रशिक्षक या विभागाच्या त्या संचालक होत्या आणि मानद व्याख्याने देत असत. ह्यू वुडिंग कायदा महाविद्यालयामध्ये त्या नैतिक अधिकार आणि कायदेशीर व्यवसाय-नियमन अभ्यापामाच्या संचालक होत्या. त्यावेळी त्यांनी अभ्यापाम तयार करण्यापासून ते शिक्षकांचे प्रशिक्षण, नावीन्यपूर्ण तंत्रांचा वापर याही गोष्टी केल्या. त्या काळात त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिले.

वीक्स यांनी ज्या वेळी राज्यकारभार स्वीकारला, त्यावेळी देश कठीण परिस्थितीतून जात होता. देशात जिविताची हमी नव्हती, मृत्युदर वाढलेला होता. नरसंहारामध्ये महिला आणि मुलांचा बळी मोठय़ा प्रमाणात जात होता. एका स्थानिक वर्तमानपत्रानुसार 2017 मध्ये जवळ जवळ सातशे लोकांची हत्या झाली होती, तर बेरोजगारीही प्रचंड प्रमाणात वाढली होती. पुढे कोरोना काळानेही वीक्स यांची परीक्षा घेतली. त्यांनी अत्यंत धाडसाने, समयसूचकतेने देशावर आलेल्या संकटांसोबत दोन हात केले. कायद्याचे शिक्षण फार उपयोगी पडले. त्यातल्या त्यात महिला आणि मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले. राष्ट्राध्यक्ष वीक्स यांना ‘ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो’ हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार मिळाला. सप्टेंबर 2018 मध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आला त्यावेळी मुलींच्या शिक्षणासाठी त्या विशेष करून काम करत होत्या. एप्रिल 2018 मध्ये कॉमनवेल्थच्या मीटिंगमध्ये मुलींच्या दर्जेदार शिक्षणासाठी स्वतंत्र शाखेची गरज निर्माण झाली. मुलींच्या शिक्षणासाठी वचनबद्ध असणाऱया पॉला-मे वीक्स यांनी ही जबाबदारी स्वतच्या खांद्यावर घेतली. कॉमनवेल्थ विकसनशील देशांमधील मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी वीक्स यांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय ठरले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लैंगिक समानता, युवा विकास, सामाजिक स्वास्थ्य या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित केले.

नुकताच मार्च 2023 मध्ये क्रिस्टिन कांगारू या आणखी एका महिलेने देशाचा कार्यभार सांभाळला आहे. वीक्स यांनी न्यायालयीन सल्लागार आणि प्रशिक्षणाच्या कार्यकारी संचालक म्हणून पुन्हा पदभार स्वीकारला. 2023 मध्ये युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अंतोनिओ गुटेरेस यांनी वीक्स यांची अध्यापन व्यवसायावरील संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय पॅनलची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. वयाच्या 75 व्या वर्षीही वीक्स या सातत्याने कार्यमग्न असतात. नैतिक नेतृत्व असेच त्यांच्या कारकीर्दीचे वर्णन करावे लागेल.

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)

[email protected]