भगवान श्री कृष्णाची कृपा असेल तर लोकसभा निवडणूक लढवेन। कंगनाचे राजकारणात उतरण्याचे संकेत

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. भगवान श्रीकृष्णाची कृपा असेल तर लोकसभा निवडणूक लढवेन असे विधान तिने केले आहे. आतापर्यंत तिला अनेकदा राजकारणात उतरणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र दरवेळी तिने नकारात्मक उत्तर दिलं होतं. यावेळी पहिल्यांदा तिने सकारात्मक उत्तर दिलं आहे.

कंगनाने नुकतेत द्वारकाधीश मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना तिने भगवान श्रीकृष्णाची कृपा असेल तर लोकसभा निवडणूक लढवेन असे म्हटले. कंगना रणौत ही तिच्या भडक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. जवळपास  प्रत्येक मुद्द्यावर ती आपले मत मांडत असते. देशाच्या राजकारण आणि इतर मुद्द्यांवरही ती बोलत असते. कंगनाची गेल्या काही दिवसातील विधाने पाहिल्यानंतर तिने राजकारणावर आपले लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसते आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनालाही कंगना हजर होती, त्याही वेळी तिने राजकारणात यायचे संकेत दिले होते.

कंगनाच्या ‘तेजस’ला समीक्षकांनी धुतलं

एकिकडे नेपोटिझमचे आरोप करत बॉलिवूडकरांशी उघडउघड ‘पंगा’ घेणाऱ्या कंगना रणौत बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरताना दिसत आहे. तिचे चित्रपट एकामागोमाग एक दणकून आपटत आहेत. धाकड, थलैवी, चंद्रमुखी असे एका रांगेत चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या तेजस या चित्रपटाची समीक्षकांकडून धुलाई झाली आहे तसंच तिकीट बारीवरही प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

एकेकाळी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं वाजवत बॉलिवूडची क्वीन झालेल्या कंगना रणौतकडे आज हिट चित्रपटांचा दुष्काळ आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्यावर नेपोटिझमचे आरोप करणं, अभिनेता हृतिक रोशन याच्यासह झालेले वाद, आपल्या चित्रपटांत दिग्दर्शकांच्या कामात ढवळाढवळ करणं, चित्रपटांच्या प्रमोशनवेळी थेट पत्रकारांशी वाद घालणं, इतर कलाकारांवर थेट चिखलफेक करणं यांमुळे कंगनाच्या इमेजला धक्का लागत गेला आणि त्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसू लागला.

म्हणूनच गेल्या काही काळापासून कंगनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले अनेक चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटल्याचं बोललं जात आहे. कंगनाचा अभिनय दिवसेंदिवस बालिश होत चालल्याची प्रतिक्रिया नेटकरी नोंदवत आहेत. चांगल्या संहिता, प्रगल्भ व्यक्तिरेखांची निवड करण्याऐवजी कंगनाने घेतलेली आडमुठी भूमिकाच तिच्या अभिनय कारकिर्दीत अडथळा ठरत आहे, असं मत समीक्षक नोंदवताना दिसत आहेत. त्यामुळे आता तिची भिस्त आगामी इमर्जन्सी या चित्रपटावर असणार आहे.