पोलिसांनीच पोलिसांना पकडले, कर्नाटक पोलीस केरळ पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनीच, पोलिसांना ताब्यात घेतल्याचा एक वेगळाच प्रकार केरळमध्ये घडला आहे. केरळ पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. कर्नाटक पोलिसांचे एक पथक 2 संशयितांना पकडण्यासाठी गेलं होतं. हे आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यातील असून त्यांच्या अटकेसाठी कर्नाटक पोलिसांचे 4 कर्मचारी केरळला गेले होते. यावेळी आरोपीला अटक करणे दूरच राहिले या पोलिसांनाच, केरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. ज्या आरोपींना पकडण्यासाठी कर्नाटक पोलीस आले होते, त्या आरोपींना गाठून या पोलिसांनी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती असा आरोप आहे.

ज्या आरोपींना पकडण्यासाठी कर्नाटक पोलीस गेले होते त्या दोन आरोपींपैकी एका आरोपीच्या होणाऱ्या बायकोने केरळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे केरळ पोलिसांनी कारवाई केली. हा सगळा प्रकार केरळच्या कोची जिल्ह्यात झाला आहे. केरळ पोलीस दलातील पोलीस उपायुक्त श्रीधरन यांनी सांगितले की कर्नाटक पोलिसांच्या 4 कर्मचाऱ्यांविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक पोलिसांचे पथक 1 ऑगस्ट रोजी केरळमध्ये आलं होतं. कर्नाटकात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचा घोटाळा झाला होता. अखिल आणि निखिल असे या घोटाळ्याचे मूख्य सूत्रधार आहेत. या दोघांना कर्नाटक पोलिसांनी केरळमध्ये येऊन पकडलं होतं. या दोघांकडे या पोलिसांनी 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती असा आरोप आहे. 25 लाख दिल्यास आम्ही तुम्हाला सोडून देऊ असं कर्नाटक पोलिसांच्या 4 कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप आहे. एका आरोपीने घाबरून 1 लाख रुपये दिले तर दुसऱ्या आरोपीने 2.95 लाख रुपये दिले होते. यानंतर एका आरोपीच्या होणाऱ्या बायकोने हा प्रकार केरळ पोलिसांपर्यंत एका तक्रारीच्या माध्यमातून पोहचवला. यानंतर केरळ पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतलं. या चौघांच्या गाडीतून 3.95 लाख रुपये मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.