किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण, ‘लोकशाही’चे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

कमलेश सुतार

भाजप नेते किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याप्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासह एका ज्येष्ठ पत्रकाराविरोधात मुंबई पूर्वच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह अश्लील व्हिडीओ क्लिप लोकशाही या वृत्तवाहिनीने प्रसारीत केली होती. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्या व्हिडीओ क्लिपची मुंबई गुन्हे शाखा चौकशी देखील करीत आहेत. सोमय्या यांनी गुन्हे शाखेच्या पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातही तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार तसेच एका ज्येष्ठ पत्रकारा विरोधात मानहानी व आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला.

दरम्यान, किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात याआधीही सहकार्य केले होते, यापुढेही करू, असे कमलेश सुतार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

पत्रकार संघटनांकडून निषेध

कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हा त्वरीत मागे घ्यावा व माध्यमांची मुस्कटदाबी थांबवावी अशी मागणी करत मुंबई मराठी पत्रकार संघ, टीव्हीजेए, क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ या संघटनांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला.