कोल्हापुरात पावसाच्या सरीमध्ये उच्चांकी गर्दीत मिरवणूक

देश स्वातंत्र्यावर आधारित चित्ररथ, चांद्रयान प्रतिकृती, फुलांची आकर्षक सजावट केलेली वाहने, दणदणाटातील साऊंड सिस्टीम आणि आकर्षक विद्युत रोषणाई अशा वैशिष्टय़ांसह पारंपरिक मर्दानी खेळ, वाद्यांचा गजर, पावसाच्या सरी झेलत उच्चांकी गर्दी अशा उत्साहाने भारलेल्या वातावरणात गुरुवारी बारा वाजता सुरू झालेली यंदाची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक तब्बल 20 तासांनी आज सकाळी आठ वाजता इराणी खाण येथे संपन्न झाली.

सुरुवातीस एकदोन मंडळांचा किरकोळ वाद, चेंगराचेंगरीचे प्रकार वगळता ही विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. रात्री बाराच्या ठोक्याला सर्व मंडळांनी स्वतःहून साऊंड सिस्टीम बंद केले. पारंपरिक वाद्यांचा गजरही थांबला. त्यामुळे पुन्हा पहाटे मिरवणुका सुरू होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने, पोलिसांच्या विनंतीवरून विद्युत रोषणाईच्या झगमगाटातच ही मिरवणूक पुढे सुरूच राहिली. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शाहूपुरी, राजारामपुरी अशा प्रमुख तालीम संस्था मंडळांनी त्यांचे वेगळेपण या मिरवणुकीत दाखवून दिले.

गुरुवारी खासबाग मैदान परिसरात मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या पालखीतील गणेशमूर्तींच्या पूजनाने यंदाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. आमदार जयश्री जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, आयुक्त के. मंजुनाथ यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विधिवत पूजा व आरती करून, मुलींच्या लेझीम पथकाच्या प्रात्यक्षिकाने ही मिरवणूक सुरू झाली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषेतील वाहनातील व्यक्ती आणि कोल्हापूरचे आजही प्रलंबित प्रश्नांची मांडणी करणारे फलक मिरवणुकीच्या सुरुवातीस लक्षवेधी ठरले.

दिवसभरात हलगी, कैचाळ, ढोल-ताशे अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघाल्या. विविध आकाराच्या आकर्षक गणेशमूर्ती तसेच त्यासमोर पारंपरिक नृत्य करत मंडळाचे कार्यकर्ते आबालवृद्धांसह फुले, चिरमुऱयांची उधळण करत निघाले होते. दुपारनंतर मिरवणुकीत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तरीसुद्धा गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात आणि साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात मंडळांनी मिरवणूक मार्गावर प्रवेश केला. त्यामुळे तर वातावरण अधिकच जल्लोषपूर्ण झाले होते. विशेषतः यंदा जल्लोषात महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात दिसून आला. आपापल्या मंडळाच्या साऊंड सिस्टीमसमोर महिलावर्गाचा जल्लोष पाहण्यासारखा होता. विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध पक्ष, संघटनांकडून मंडळांना पान, सुपारी देण्याची परंपरा यंदाही जपली.

दरम्यान, मध्यरात्री बारानंतर साऊंड सिस्टीमचा दणदणाट सुरू राहील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच रात्री बाराच्या ठोक्याला सर्वच मंडळांनी स्वतः आपापले साऊंड सिस्टीम बंद केले. पारंपरिक वाद्यांचा दणदणाटही बंद केला. यानंतर पहाटे सहानंतर पुन्हा वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघतील अशी परिस्थिती असताना, पोलीस दलाने केलेल्या विनंतीला मान देत, सर्व मंडळांनी शांततेत विसर्जन मिरवणूक सुरूच ठेवली. पापाची टिकटी येथे जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित आदींच्या उपस्थितीत शेवटच्या विसर्जन मिरवणुकीतील गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर सव्वाआठच्या सुमारास इराणी खण येथे विक्रमनगर येथील श्रमिक युवा मित्र मंडळाच्या शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करून सांगता झाली.

2 हजार 92 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

यंदा मुख्य पारंपरिक मार्गासह दोन पर्यायी मार्ग अशा तीन मार्गांवरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन रंकाळा तलाव परिसरातील इराणी खण येथे करण्यात आले. 24 तासांत या खणीमध्ये 1 हजार 14 मोठय़ा आणि 1 हजार 78 लहान अशा एकूण 2 हजार 92 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. निर्माण चौक येथे एकूण 305 आणि पापाची टिकटी येथे स्वागत मंडपात एकूण 255 गणेश मंडळांची नोंद झाली. दरम्यान, विसर्जनमार्ग आणि आसपासच्या परिसरात पाण्याच्या बाटल्या, तुटलेल्या चपलांचा ढीग गोळा करून महापालिका कर्मचाऱयांनी स्वच्छता मोहीम राबविली.

पालकमंत्र्यांची अनुपस्थिती

विसर्जन मिरवणूक सुरुवातीस पालकमंत्र्यांची उपस्थिती यंदा खंडित झाली. आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात असलेले दीपक केसरकर हे निघून गेले. तर नेहमी मिरवणुकीत उपस्थित असलेले आमदार सतेज पाटील यांची अनुपस्थिती दिसून आली. खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती.